Buldhana News: बुलढाण्यात मस्साजोग?; भाजपा कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला नवीन वळण
Buldhana News: भाजपा कार्यकर्ता असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला नवीन वळण

Buldhana News बुलढाणा: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता बुलढाण्यात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपा कार्यकर्ता पंकज देशमुख (Buldhana Pankaj Deshmukh Death) यांची आत्महत्या नसून घातपात असल्याची तक्रार पंकज देशमुख यांची पत्नी सुनीता देशमुख यांनी केली आहे. तसेच पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशीची मागणी देखील सुनीता देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे बुलढाण्यात देखील मस्साजोगसारखी घटना घडली की काय?, असा सवाल उपस्थित होतोय.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता व भाजपा आमदार संजय कुटे यांचा वाहन चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आलं आहे. गेल्या 03 मे रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत व संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्यावेळी पंकज देशमुख यांच्या हातावर पायावर व मानेवर अनेक जखमाही आढळल्या होत्या.
पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला नवीन वळण-
जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेहाच शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात केलं असं असलं तरी पंकज देशमुख यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चाही जळगाव जामोद परिसरात होत होती. मात्र आता पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती व बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याची तक्रार केली आहे. सोबतच जळगाव जामोद पोलिसांचा तपास हा संशयास्पद असून जळगाव जामोद पोलिसांवर माझा विश्वास नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे माझ्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन गंभीर वळण मिळाल आहे.
शोध घेण्याचं आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर-
पंकज देशमुख हा गेल्या 22 वर्षापासून भाजप कार्यकर्ता व जळगाव जामोदचे भाजपा आमदार संजय कुटे यांचा वाहन चालक असल्याने त्यामुळे सुनिता देशमुख यांना नेमका कुणावर संशय आहे...? जळगाव जामोद पोलिसांवर सुनीता देशमुख यांचा विश्वास का नाही...? पंकज देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं सुनीता देशमुख यांना का वाटतं...? असे अनेक प्रश्न आता उपस्थित राहिले आहे. अलीकडेच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता बुलढाण्यातही तसेच काही घडतं आहे का...? याचा शोध घेण्याचं आव्हान आता बुलढाणा पोलिसांसमोर आहे.
























