Bhandara Rain: पूर्व विदर्भात जोरदार पाऊस, गोसीखुर्द धरणाचे सर्वच 33 गेट उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कालपासून पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळं गोसीखुर्द धरणाच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळं धरणाचे सर्वच्या सर्व 33 गेट अर्धा मीटरनं उघडले आहेत.
Bhandara Rain: हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. कालपासून पूर्व विदर्भामध्ये (East Vidarbha) कुठं हलक्या, कुठं मध्यम तर, कुठं जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. आणखी पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, भंडारा (Bhandara) जिल्ह्यात जोरदार पावसामुळं नदी नाले आता पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागले आहेत. जोरदार पावसामुळं गोसीखुर्द धरणाच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळं धरणाचे सर्वच्या सर्व 33 गेट अर्धा मीटरनं उघडले आहेत. धरणातून 1 लाख 36 हजार 743 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कालपासून भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसानं हलक्या भात पिकाला धोका निर्माण होईल, तर, जड भात पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. दरम्यान, गेल्या 48 तासांपासून गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. परिणामी, वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं या नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळं गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून प्रति सेकंद 1 लाख 36 हजार 743 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्यानं पाऊस पडत असल्यानं धरण सुरक्षेच्या दृष्टीनं आणि धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील काही तासात गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्यानं नदी काठावरील ग्रामस्थांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची हजेरी
हवामान विभागानं दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर कालपासून भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. सतत त्यांनी सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर, काही गावांतील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसानं तर, गडचिरोली आणि वर्धा इथं हलक्या स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावलेली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील इटीयाडोह धरण ओव्हरफ्लो
जोरदार पावसामुळं गोंदिया जिल्ह्यातील इटीयाडोह धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यातून निघणारं पाणी कालव्यात विसर्ग होत आहे. तर, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. परिणामी, वैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं या नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. सध्या पूर्व विदर्भात कुठेही पूर परिस्थिती नाही. अशीच परिस्थिती नागपूर जिल्ह्यातही असून नदी नाले धोक्याच्या पातळीपेक्षा कमी असले तरी नदीनाल्यांना आलेल्या पाण्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: