Bhandara News: डॉक्टरांनी 14 इंजेक्शनचं नाव काढताच वाघाने हल्ला केलेला पेशंट रुग्णालयातून घरी पळाला, भंडाऱ्यात नेमकं काय घडलं?
Bhandara News: डॉक्टरच्या 14 इंजेक्शनच्या सल्ल्यानं बेडवर झोपलेल्या रुग्णानं ठोकली घराकडं धूम, वाघानं हल्ला केल्याचा बनाम रचणाऱ्या इसमाचं पितळ उघड, वन विभागाच्या आर्थिक मदतीसाठी भंडाऱ्याच्या साकोलीतील अजब प्रकार.

Bhandara News: वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची बतावनी करून रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला रेबीजचे 14 इंजेक्शन घ्यावे लागणार, असा सल्ला डॉक्टरांनी रुग्णाला दिला. डॉक्टरांचा हा सल्ला ऐकून वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा बनाम करणारा रुग्ण, जो रुग्णालयात बेडवर झोपलेला होता, तो थेट उभा झाला आणि त्याने घराकडं धूम ठोकली आणि वाघाच्या हल्ल्याचा बनाव उघड झाला. वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची रुग्णांनं तयार केलेली ही रंजक कथा भंडाऱ्याच्या साकोलीत उघडकीस आली आहे.
नेमकं काय घडलं?
साकोली तालुक्यातील मोहघाटा येथील दुधराम मेश्राम असं वाघांच्या हल्ल्याची रंजक कथा तयार करणाऱ्या इसमाचं नावं आहे. दुधराम मेश्राम हे मोहफूल गोळा करण्याकरिता शेतात गेले होते. मात्र, त्यानंतर जे घडलं किंवा घडविण्यात आलं ते सर्वांना आश्चर्यात टाकणारं आणि धक्कादायक ठरलं. काटेरी झुडपात पडल्यानं दूधराम यांच्या शरीरावर ओरबडे पडलेत. मात्र, वाघानेचं हल्ला करून त्याला ओरबडल्याचा बनाव करीत ग्रामस्थांच्या मदतीनं तो साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. वनविभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी आणि रुग्णालयातील वैद्यकीय पथक यांना दुधरामच्या शरीरावर असलेल्या जखमांना बघून संशय आला. त्यामुळं डॉक्टरांनी रेबीजचे 14 इंजेक्शन घ्यावं लागेल तरचं वाघानं केलेल्या जखमेतून प्रकृती सुधारेल असा सल्ला दिला.
मात्र, इंजेक्शनच्या नावानं दुधराम यांची बोबडी वळली आणि भीतीपोटी त्यानं, वाघानं नाही तर, झुडपात पडल्यानं शरीरावर काटे ओरबडल्याचे सांगितलं आणि सर्वांनी तोंडावर बोटं ठेवली. मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडलेल्या असून काही प्रसंगी शेतकऱ्यांचा दुर्दैवी जीवही गेला आहे. मात्र, काही लोकं वन विभागाकडून फक्त नुकसान भरपाईचा मोबदला लाटण्यासाठी असा बनाव करीत असल्याचं या घटनेवरून उघड झालं आहे.























