Bhandara News: धान खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक; थम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी, शेतकऱ्यांना नोंदणीसाठी विलंब
भंडारा जिल्ह्यात खरीप, रब्बी आणि उन्हाळी असं तीनवेळा धानाचं उत्पादन घेतल्या जाते. उन्हाळी धान विण्यासाठी भंडारा जिल्ह्यात 284 केंद्र सुरू करण्यात आली आहेत
भंडारा : शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवी, आणि पारदर्शकता असावी यासाठी धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी आणि थम मशीन ठेवण्यात आले आहे. मात्र थम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी विलंब लागत आहे. तसंच सरकारने नोंदणीसाठी अद्याप मुदतवाढ न दिल्याने भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील हजारो शेतकरी धान नोंदणी आणि विक्रीपासून वंचित राहणार आहेत. तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांची केंद्रावर लूट होत असल्यानं नाईलाजानं खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत असल्याचं चित्र आहे
शेतकऱ्यांची होणारी लूट अद्यापही थांबलेली नाही
धान उत्पादक जिल्हा म्हणून भंडाऱ्याची ओळख आहे. मागील वर्षीपर्यंत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांचे धान खरेदी करत असल्याचे कागदपत्रे तयार करून प्रत्यक्षात मध्यप्रदेश आणि अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात धान आणून काळाबाजार करण्यात येत होती. यामुळं भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मात्र शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीपासून वंचित राहत चित्र समोर आलं होतं. त्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांची लूट थांबवता यावे आणि बाहेर राज्यातील धान जिल्ह्यात पोहचणार नाही याची खबरदारी राज्य सरकारनं घेतली. असं असतानाही शेतकऱ्यांची होणारी लूट अद्यापही थांबलेली नाही. किंबहुना खरीप तोंडावर असल्यानं शेतकरी त्यांचे धान खासगी व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकताना दिसत आहे.
ॲपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी
भंडारा जिल्ह्यात खरीप, रब्बी आणि उन्हाळी असं तीनवेळा धानाचं उत्पादन घेतल्या जाते. उन्हाळी धान विण्यासाठी भंडारा जिल्ह्यात 284 केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या नोंदणी आणि थम साठी केवळ 127 केंद्रांना मशीन देण्यात आल्या आहेत. ई -पिक नोंदणी ज्या शेतकऱ्यांनी केलेली असेल अशा शेतकऱ्यांची या मशीनमध्ये माहिती अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळं अशा शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी नेत असताना प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर धान विक्री करताना या मशीनवर शेतकऱ्यांना अंगठा देऊन धनाची विक्री होते. मात्र, महाभूमी ॲपच्या माध्यमातून महसूल आणि पणन महासंघाने तयार केलेल्या या ॲपमध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. किंबहुना शेतकऱ्यांची माहिती अद्यावत झालेली नसल्याने ध्यान विक्री करताना शेतकऱ्यांना त्यांची ई - पीक नोंदणी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळं गेले असता शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे.
थम मशीनचा तिढा
आता खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना बी बियाणे आणि रासायनिक खतांच्या खरेदीसाठी पैशाची गरज भासणार आहे. त्यामुळं शेतकरी खरेदी केंद्रावर चकरा मारीत असतानाही थम मशीनचा तिढा सुटलेला नाही. मागील वर्षी सुमारे 56 हजार शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी नोंदणी झाली होती. मात्र, यावर्षी सरकारच्या पारदर्शक उपाय योजनेनंतरही शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. धान खरेदी केंद्रावर शेतकरी जेव्हा धान मोजतो तेव्हा प्रती क्विंटल 5 किलो तूट दाखविण्यात येत असून हमालीचे 12 रुपये कपात करून शेतकऱ्यांना लुटल्या जात असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. तर, दुसरीकडं मागील वर्षीच्या तुलनेत अद्यापही हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने पैशाची गरज लक्षात घेता, आता शेतकरी त्यांचे धान व्यापाऱ्यांना अगदी अल्प दरात विकत आहेत.