Bhandara News: सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं पण दर मिळत नसल्यानं उत्पादन घरात पडून, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू
सूर्यफूलाला दर मिळत नसल्यानं शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांची कशी आर्थिक कोंडी होतेय, हे सांगताना शेतकऱ्यांचा कंठ दाटून येत आहे.
भंडारा : तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देण्याचं धोरण केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर राबविलं जात आहे. मात्र, भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातील सूर्यफूल (Sunflower) उत्पादकांवर विक्रीसाठी गावोगावी भटकंतीची वेळ आली आहे. भंडारा जिल्ह्यातील सालेबर्डी या गावात मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहे. मात्र, सूर्यफुलाला दर मिळत नसल्यानं शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांची कशी आर्थिक कोंडी होतेय, हे सांगताना शेतकऱ्यांचा कंठ दाटून येत आहे.
तेल बियावर्गीय पिकांचं क्षेत्र कमी असल्यानं सरकारला खाद्यतेलाची आयात करावी लागते. परिणामी केंद्र सरकारनं ही अवलंबिता कमी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. धान उत्पादक भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातपीक परवडत नसल्यानं 2007 पासून शेतकरी सुर्यफुलाच्या शेतीकडं वळाले आहेत. योग्य दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी सातत्यानं चांगलं उत्पादन घेतल. 2008 मध्ये 2200 रुपये क्विंटलचा दर मिळाला. 2022-23 या हंगामात सूर्यफुलाचा हमीभाव 6400 तर 2023- 24 मध्ये 6 हजार 760 रुपये हमी भाव घोषीत झाला आहे. त्यामुळं शेकडो शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्ये सूर्यफुलाची लागवड केली. मार्चमध्ये पिकाची काढणी केली आणि भरघोस उत्पादन झालं. मात्र, आता खरेदीदार मिळत नसल्यानं गावातील सूर्यफूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पाच महिन्यांपासून हजारो क्विंटल सूर्यफूल बी शेतकऱ्यांच्या घरात पडून
सूर्यफूलाचं उत्पादन मार्च महिन्यात हातात आलं आणि आता पाच महिने झाले आहेत. या सूर्यफुलाला सरकारनं घोषित केलेला हमी भाव मिळत नसल्यानं शेतकरी भंडारा जिल्ह्यातील तुमसरसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक, नागपूर येथील बाजारपेठेत गेले आहेत. मात्र, दलालांनी त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. हमी भाव 6760 रुपयांचा असताना दलाल मात्र, शेतकरी यांनी उत्पादन केलेलं सूर्यफूल केवळ 2 ते 3 हजार रुपयांनी खरेदी करण्याची तयारी दर्शवित आहेत. एकीकडे या शेतकऱ्यांनी सुर्यफुलाचे बी पूर्व विदर्भात मिळत नसल्यानं जळगाव इथून खरेदी करून आणले. मात्र, आता दर मिळत नसल्यानं पाच महिन्यांपासून हजारो क्विंटल सूर्यफूल बी शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. परिणामी, भात पीक परवडत नाही म्हणून, नवीन उत्पादन घेतलं. मात्र, त्यातही त्यांची अशी परवड होत असल्यानं शेतकरी अर्थिक विवंचनेत सापडला आहे.
सूर्यफुलाच्या व्यवस्थापनावर एकरी 20 हजार रुपयांचा खर्च झाला असून एकरी सात क्विंटल उत्पादन मिळाले. तेलघाणी व्यावसायिक एक-दोन क्विंटल मालाची 2 ते 3 हजार रुपयांत मागणी करून शेतकऱ्यांची बोळवण करीत असून सरकार याकडं लक्ष देणार का? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हे ही वाचा :