Atul Kulkarni Poem: "लोक चिरडले जातात... लोकांची प्रेतं बनतात..."; अतुल कुलकर्णींनी रचलेली नवी कविता 'लोक-मताची डुबकी'
Atul Kulkarni Poem On Indian Politics: अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक कविता शेअर केली आहे. अनेकांकडून या कवितेवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Atul Kulkarni Poem On Indian Politics: वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणारे अभिनेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी इंडस्ट्रीत आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. केवळ मराठीच नाहीतर हिंदी भाषिक चित्रपटांसह इतर अनेक प्रादेशिक भाषांतील चित्रपट, मालिकांमध्ये अतुल कुलकर्णी यांनी आपला ठसा उमटवला आहे. 'नटरंग' (Natarang Movie) चित्रपटात त्यांनी गुनवंतराव कागलकर उर्फ 'गुणा'ची भूमिका साकारली आहे, या भूमिकेनं अतुल कुलकर्णी महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमुळे ते चर्चेत आले होते. अलिकडच्या काळात त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत काम का केलं नाही? यावर त्यांनी भाष्य केलेलं. पण, आता पुन्हा एकदा अतुल कुलकर्णी चर्चेत आले आहेत, ते त्यांनी रचलेल्या एका कवितेमुळे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर हँडलवरुन ही कविता शेअर केली असून अनेकांकडून या कवितेवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक कविता शेअर केली आहे. यामधून त्यांनी गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या काही घटनांवर भाष्य केल्याचं दिसतंय . 'लोक-मताची डुबकी' या शीर्षकाखाली अतुल कुलकर्णी यांनी कविता लिहिली आहे.
अतुल कुलकर्णींची कविता 'लोक-मताची डुबकी'
"मतं गर्दी करतात,
मतं डुबकी घेतात.
लोक चिरडले जातात,
लोकांची प्रेतं बनतात,
लोक रडतात-भेकतात,
लोक शांत होतात.
पाच वर्षं सरतात,
12 वर्ष सरतात.
परत,
मतं गर्दी करतात,
मतं डुबकी घेतात.
लोक चिरडले जातात,
लोकांची प्रेतं बनतात,
लोक रडतात-भेकतात,
लोक शांSsSSत होतात.
परत,
मतं मनोरे रचतात,
मतं जल्लोष करतात.
लोक कोसळून पडतात,
लोक घायाळ होतात,
लोक रडतात, भेकतात,
लोक शांSsSSत होतात,
पाच वर्षं सरतात,
बारा महिने सरतात,
परत,
लोक मतं मनोरे रचतात,
मतं जल्लोष करतात.
लोक कोसळून पडतात,
लोक घायाळ होतात,
लोक रडतात भेकतात,
लोक शांSsSSत होतात,
परत…,
मतं रक्त सांडतात,
लोक शांत राहतात,
लोक भक्त असतात,
लोक मतं बनतात,
मतं आंधळी होतात,
लोक ठेचा खातात.
मतं रक्त सांडतात,
लोक शांत राहतात,
परत...
- अतुल कुलकर्णी
अतुल कुलकर्णी आपल्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अशातच, फारच मोजके मराठी कलाकार उघडपणे आणि स्पष्ट मतं मांडताना दिसतात. यापैकीच अतुल कुलकर्णी एक नाव. ते नेहमीच विविध विषयांवर व्यक्त होतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमधील मतदानावेळी लिहिलेल्या एका कवितेनंही लक्ष वेधून घेतलं होतं. अतुल कुलकर्णी नेहमीच राजकीय मुद्द्यावर ठामपणे आणि परखडपणे भाष्य करतात. मतदार म्हणून आपण कुठे चुकतो, हे त्यांनी त्यांच्या 'वेडी आशा' या कवितेत मांडलं होतं. अशातच आता त्यांनी लिहिलेल्या 'लोक-मताची डुबकी' या कवितेतून त्यांनी गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या भीषण घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
— atul kulkarni (@atul_kulkarni) February 17, 2025
'लोक-मताची डुबकी' या कवितेतून अतुल कुलकर्णी यांनी गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या भीषण घटनांचा उल्लेख केला आहे. सध्या प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी या महाकुंभ मेळ्यात अनेक चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. तसेच, दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरीची घटना घडली होती. याचाही उल्लेख केल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

