(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole on Ashish Shelar : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आशिष शेलारांना राग, चाटूगिरीवर त्यांनी न बोललेलं बरं; नाना पटोले यांचा प्रतिहल्ला
आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात यायचं होतं, त्यांना तिथे स्थान मिळालं नाही, याचा राग आहे. चाटूगिरीबाबत आ त्यांनी न बोललेलंच बरं, असं खोचक प्रतिउत्तर नाना पटोले यांनीआशिष शेलार यांना दिलं आहे.
Patole On Shelar : आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात यायचं होतं, त्यांना तिथे स्थान मिळालं नाही, याचा राग आहे. चाटूगिरीबाबत आशिष शेलार यांनी न बोललेलंच बरं, असं खोचक प्रतिउत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना दिलं आहे. ते भंडाऱ्यात (Bhandara) बोलत होते.
शिंदे-फडणवीस दिल्ली भेटीवर पटोलेंची टीका, शेलारांचं प्रत्युत्तर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कायम दिल्लीत हुजरेगिरी करण्यासाठी जातात अशी प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस दिल्ली भेटीवर दिली होती. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिलं होतं. नाना पटोले दिल्लीत जाऊन चाटूगिरी करतात, असा टोला शेलार यांनी लगावला होता.
चाटूगिरीवर आशिष शेलारांनी न बोललेलं बरं : नाना पटोले
यावर आता नाना पटोले यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. नाना पटोले म्हणतात की, आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात यायचं होतं, त्यांना तिथे स्थान मिळालं नाही, याचा राग आहे. त्यांचा पक्षाच्याच नेत्यांवर राग आहे. पर्यायाने, लेकी बोले आणि सुने लागे, अशा पद्धतीची त्यांची मानसिकता आहे. चाटूगिरीवर आशिष शेलार यांनी नाही बोललं तर बरं होईल.
राज्याचे मुख्यमंत्री जाहीरपणे सांगतात की, ते अमित शहाचे हस्तक आहेत. त्याचं उत्तर त्यांनी पाहिले दिलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री हा दिल्लीच्या नेत्यांचा हस्तक आहे, हे जाहीरपणे सांगतात. याचं उत्तर त्यांनी पाहिले दिलं पाहिजे, आणि चाटूगिरी कोण करतंय, हे तर त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं असल्याचा प्रतिहल्ला नाना पटोले यांनी केला.
दिल्ली भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (4 जून) दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. सोबतच शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला दिली.