Bhandara SSC Exam : घरी बापाचा मृतदेह, धैर्य दाखवून लेक दहावीच्या परीक्षेला; भंडाऱ्याच्या प्राचीचा धीरोदात्तपणा
Bhandara SSC Exam : घरात वडिलांच्या अंत्यविधीची लगबग सुरु असताना मुलीचा दहावीचा इंग्रजीचा पेपर असल्याने तिची तगमग सुरु होती. अशात कुटुंबियांनी तिला धीर देत परीक्षेसाठी पाठवलं आणि घरात वडिलांचा मृतदेह असताना मोठ्या धैर्याने तिने पेपर दिला.
Bhandara SSC Exam : दहावी परीक्षेदरम्यान (SSC Exam) ऐन इंग्रजी विषयाच्या पेपरच्या (English Paper) दिवशी वडिलांच्या मृत्यूची बातमी आली. याची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब आणि ग्रामस्थांमध्ये शोक पसरला. याचवेळी घरात वडिलांच्या अंत्यविधीची लगबग सुरु असताना मुलीचा दहावीचा इंग्रजीचा पेपर असल्याने तिची तगमग सुरु होती. अशात कुटुंबियांनी तिला धीर देत परीक्षेसाठी पाठवलं आणि घरात वडिलांचा मृतदेह असताना मोठ्या धैर्याने तिने पेपर दिला. प्राची राधेश्याम सोंदरकर रा. सोनी असं विद्यार्थिनीचं नाव आहे.
मागील महिन्यात अपघात, नागपूरमध्ये उपचार
लाखांदूर तालुक्यातील सोनी-संगम इथले रहिवासी असलेले राधेशाम सोंदरकर यांचा मागील महिन्यात अपघात झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखांदूरवरुन स्वगावी सोनीकडे जात असताना मेंढा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत अपघात झाला होता. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. राधेशाम यांना दोन मुली असून, मोठी मुलगी दहावीत तर लहान मुलगी सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे.
...आणि सकाळी सहा वाज फोन खणाणला!
दरम्यान, एकीकडे राधेशाम यांच्यावर नागपुरात उपचार सुरु असतानाच तोंडावर दहावीची परीक्षा होती. घरातील कर्त्या पुरुषाचा अपघात झाल्याने घरात शोकाकूल वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुलीने या संकटकाळात खचून न जाता, वडिलांनी मुलींनाच मुलासमान जपत, "पोरी, अभ्यास कर, उच्चशिक्षण घेऊन पुढे जा, खूप मोठी हो, स्वत:च्या पायावर उभी राहो," हा वडिलांनी सांगितलेला कानमंत्र लक्षात ठेवत दहावीच्या परीक्षेची तयारी चालू ठेवली. गुरुवारी दहावीचा पहिला मराठीचा पेपर झाल्यानंतर पाच दिवसानंतर असलेल्या दुसऱ्या इंग्रजीच्या पेपरची तयार केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आणि पहाटे लवकर उठून अभ्यास करत होती. परंतु सकाळी 6 वाजताच्या सुमारास मोबाईल फोन खणाणला आणि तो परीक्षार्थी मुलीने उचलला. वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच मुलगी नि:शब्द झाली. वडिलांच्या मृत्यूची बातमी मोहल्ल्यात वाऱ्यासारखी पसरली, शेजारी एकवटले, बघता-बघत घरासमोर गर्दी झाली, शोकाकूल वातावरणात आई, आजी, काका, काकू, लहान बहीण रडायला लागले. मात्र प्राचीने वडिलांच्या मृत्यूचे दु:ख लपवून ठेवत न रडता आपले ध्येय गाठायचा प्रण केला. तयारी करुन आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगंज वडसा येथील 1939 हे परीक्षा केंद्र गाठलं.
मुख्याध्यापकांनीही धीर दिला
प्राचीच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. दामोधर सिंगाडे यांना घटनेची माहिती झाल्याने त्यांनी प्राचीला पेपर सोडवण्यासाठी धीर देऊन वडिलांची स्वप्नपूर्ती करण्यास सांगितलं. प्राचीने देखील घरी वडिलांचा अंत्यविधी असताना तिने धैर्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली आहे. प्राचीच्या या धाडसी निर्णयामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI