Bhandara Crime : आपापसातील वादातून तरुणाची हत्या, नागरिकांनी पाठलाग करत चोप दिल्याने तीन आरोपी जखमी
Bhandara Crime : टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करत त्यांना पकडलं आणि बेदम चोप दिला. यात एक आरोपी गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Bhandara Crime : टोळक्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणाचा मृत्यू (Murder) झाला. यानंतर तिथे उपस्थित नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करत त्यांना पकडलं आणि बेदम चोप दिला. यात एक आरोपी गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेही मृताच्या मित्रांनी आरोपींना पुन्हा बदडलं. भंडारा (Bhandara) शहरातील गांधी चौकात शनिवारी (27 मे) रात्रीच्या सुमारास घडली.
टोळक्याच्या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू
आपापसातील वादातून टोळक्याने तरुणाची हत्या केल्याचं समजतं. अमन नांदुरकर (वय 22 वर्षे) असं मृत तरुणाचं नाव आहे. तो लस्सी विक्रेता होता. टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
आधी नागरिकांनी हल्लेखोरांना चोपलं, मग मृताच्या मित्रांनी रुग्णालयात जाऊन मारलं
या घटनेनंतर परिसरात उपस्थित नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करुन त्यांना चांगलाच चोप दिला. नागरिकांच्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून त्यातील अभिषेक साठवणे हा आरोपी गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले आहे. यानंतर मृताच्या मित्रमंडळींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत तिथे उपचारासाठी दाखल आरोपींना पकडून मारहाण केली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांसह राज्य राखीव दलाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
VIDEO : Bhandara Crime : भंडाऱ्यात जुन्या वादातून लस्सी विक्रेत्याची हत्या
तरुणी चार वर्षांपासून बेपत्ता, शोधकार्यात गवसले हत्येचे आरोपी
2019 मध्ये बेपत्ता झालेल्या तरुणीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याची कुणकुण आता तब्बल चार वर्षानंतर भंडारा पोलिसांना लागली. त्यामुळे भंडारा पोलीस मागील सहा-सात दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह शोधण्यात दिवसरात्र लागले आहेत. आरोपींनी तरुणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असली तरी, मृतदेहाच्या अवशेषांचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही, त्यामुळे पोलिसांवरील दबाव वाढताना दिसत आहे. आदिवासी कुटुंबातील तरुणी 20 एप्रिल 2019 रोजी अचानाक गायब झाली. काही दिवस शोध मोहीम राबवल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची फाईल बंद केली. परंतु बेपत्ता असलेल्या तरुणीबाबत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ही फाईल पुन्हा उघडण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावातील पाटील संजय बोरकर, राजकुमार बोरकर या दोन सख्ख्या भावांसह त्यांचा चालक धरम सरयाम या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्यांनी तरुणीच्या मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितलेल्या जंगल परिसरात मृतदेहाची शोध मोहीम सुरु केली आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून पोलीस अहोरात्र जंगल परिसरात खोदून अवशेष शोधण्याचा प्रयत्न करत असले तरी, त्यांच्या हाती अद्याप काहीही सापडलेले नाही.