Beed : आम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख कुटुंबीयांची पंकजा मुंडेंकडे मागणी
Santosh Deshmukh Murder Case : या आधी देशमुख कुटुंबीयांशी संपर्क केला होता, पण त्यांनी भेटायला येऊ नका असं सांगितल्याचं राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.
सोलापूर: पंकजा मुंडे यांचा एकदा व्हिडीओ कॉल आलेला, पण आम्हाला न्याय देऊनच भेटायला या असं त्यांना सांगितल्याची माहिती सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली. संतोष देशमुख हे भाजपचे बूथ प्रमुख होते, त्यामुळे त्यांना न्याय मिळावा अशी मागणीही पंकजा मुंडे यांच्याकडे केली असल्याचं ते म्हणाले. आतापर्यंत धनंजय मुंडे यांचा एकही कॉल आला नाही किंवा त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
पंकजा मुंडेचा व्हिडीओ कॉल आला होता
संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यासंबंधित पंकजा मुंडेंनी एकदा व्हिडीओ कॉल केल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली. त्यावेळी आम्हाला न्याय देऊनच भेटायला या असं संतोष देशमुखांच्या पत्नीने पंकजा मुंडे यांना सांगितलं. या काळात मात्र धनंजय मुंडे यांचा एकही कॉल आला नाही असंही धनंजय देशमुखांनी सांगितलं.
अजित पवारांना जाब विचारणार
बीडचे पालकमंत्री अजित पवारांना मस्साजोगचे ग्रामस्थ जाब विचारणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. अजितदादांना मस्साजोगमध्ये बोलवायचं की बीडमध्ये त्यांची भेट घ्यायची हे ग्रामस्थ ठरवतील असंही ते म्हणाले.
या प्रकरणात सरकारी वकिलाची नियुक्ती होण्यासाठी वेळ लागत असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. या प्रकरणात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटायला का गेला नाहीत असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, "संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटायला जाण्यापूर्वी त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. त्यावेळी मस्साजोगची परिस्थिती ठिक नाही, त्यामुळे तुम्ही आता भेटायला येऊ नका असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आपण त्या ठिकाणी गेले नाही. ज्यावेळी देशमुख कुटुंबीय म्हणतील त्यावेळी त्यांना भेटायला जाणार. माझ्यासाठी त्या कुटुंबाला भेटायला जाण्यापेक्षा त्यांना न्याय मिळणं अधिक महत्त्वाचं आहे."
वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्हीसीद्वारे वाल्मिक कराडची सुनावणी पूर्ण झाली. चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने कोठडीमध्ये वाढ मागितली नाही. खंडणी आणि मकोका या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला आता जामीन मिळण्याची शक्यता देखील वाढली आहे.
ही बातमी वाचा :