Beed : अवैध गर्भपात प्रकरणी डॉ.नंदकुमार स्वामीला सात दिवसाची पोलीस कोठडी, निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली चालवायचा अवैध गर्भपात केंद्र
Parali Illegal Abortion Case : मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात केल्याची घटना परळीत उघडकीस आली आहे.
बीड : मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात ( Illegal Abortion) केल्याची घटना परळीत उघडकीस आली आहे या प्रकरणी डॉ. नंदकुमार स्वामी याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून अवैध गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर स्वामीला परळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. स्वामीवर यापूर्वीसुद्धा अवैध गर्भपाताचे तीन गुन्हे दाखल आहेत.
परळीतील (Parali Illegal Abortion Case) एक दाम्पत्यानं यांच्याकडे गर्भलिंग चाचणी केली. अवैधरित्या ही चाचणी झाली. त्यात त्या दाम्पत्याला दुसऱ्यांदा मुलगी होणार हे कळलं. पती आणि सासूच्या सांगण्यावरून डॉक्टरनं त्या महिलेला एक इंजेक्शन दिलं. महिलेच्या इच्छेविरोधात अवैधरित्या गर्भपात केला. या प्रकरणी परळी न्यायालयाने आज डॉ. नंदकुमार स्वामी याला सात दिवसाची म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नंदकुमार स्वामी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहे. प्राथमिक माहितीनुसार तो एका रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करत होता. तिथे शिकलेल्या या जुजबी ज्ञानावर तो लोकांसमोर डॉक्टर म्हणून वावरू लागला. बार्शीतल्या दत्तनगर परिसरात निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली त्याने अवैध गर्भापात सुरु केले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील झाला होता.
सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात देखील त्याचे हे अवैध व्यवसाय सुरूच होते. 2017 साली परळी बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात स्वामी हा अवैध गर्भपाताचे केंद्र चालवायचा त्याच्या काळ्या धंद्याचा पोलिसांना सुगावा लागला आणि त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांनी केली होती
तीन वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर बार्शीच्या सत्र न्यायालयात बार्शी सत्र न्यायालयाने नंदकुमार स्वामीला जामीन मंजूर केला. जामीनावर बाहेर असलेल्या स्वामीने बीडमध्ये पुन्हा तोच प्रकार केला आहे. पुन्हा अवैध गर्भपात करायला सुरुवात केली मात्र त्याच्या याच काळा धंद्याची माहिती ज्या महिलेचा त्याने गर्भपात केला त्याच महिलेने परळी पोलिसांना दिली.