Pankaja Munde : बीडमधील अधिकारी त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी आणले, अजित पवारांनी जिल्ह्याचे 'पर्यावरण' सुधारावे : पंकजा मुंडे
Santosh Deshmukh Murder Case : बीडचे राजकीय वातावरण बिघडलंय असं म्हणायला जड जातंय. पण कुणी ते बिघडवत असेल तर त्याला कुणीही पाठीशी घालू नये असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुंबई : संतोष देशमुख माझा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना घेऊन भाषण देण्यापेक्षा त्यांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे, तीच माझी भूमिका आहे असं राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. आपण गेल्या पाच वर्षांपासून बीडच्या राजकारणापासून दूर होतो. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कार्यरत असलेले अधिकारी त्यावेळचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणले आहेत असंही त्या म्हणाल्या. तसेच अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडचे राजकीय पर्यावरण सुधारू शकतील पंकजा मुंडे म्हणाल्या. पर्यावरण खात्याचा पदभार घेतल्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या.
मी कसा कुणावर आरोप करू?
या प्रकरणात कोण आहेत हे मला माहिती नाही मग मी कुणावर कसा आरोप करू? आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता होता. त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीडचे अधिकारी त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी आणले
बीडचे अधिकारी बहुतांश एकाच जातीचे आणि एकाच नेत्याच्या जवळचे असल्याचा आरोप या आधी करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही नावासहित त्याची आकडेवारी समोर आणली होती. त्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी पाच वर्षे जिल्ह्याच्या राजकारणापासून दूर होते. मग हे अधिकारी मी आणले का? बीडमधील हे अधिकारी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणले आहेत. धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते, पण आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनीही केली आहे."
बीडच्या प्रकरणात धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, त्यावर त्यांच्या पक्षाचे नेते आणि सर्वोच्च नेते उत्तरं देऊ शकतात. माझे काही प्रोटोकॉल आहेत, मी मंत्री आहे. मी यावर काही बोलणं योग्य नाही.
अजित पवार, मुख्यमंत्री बीडचे पर्यावरण सुधारू शकतील
पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याचे वातावरण बिघडलं आहे हे बोलतानाही मन जड होत आहे. कारण राज्यभर घडणाऱ्या घटनांचा मी आढावा घेते. यावर आता अजित पवार, मुख्यमंत्री जिल्ह्याचे पर्यावरण सुधारू शकतील. बीडचे राजकीय पर्यावरण लवकरच बदलेल असा मला विश्वास आहे. या कामात माझी त्यांना साथ असेल.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "अंजली दमानियांना जे कोणी धमकावत असतील तर त्यांनी तक्रार दाखल केली पाहिजे. ते माझे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी माझं नाव घेताना, कोणत्याही जातीविषयी बोलताना काळजी घ्यावी. कारण मी पाच वर्षे बाहेर होते. माझे कार्यकर्ते जरी असतील तरीही त्यांच्यावर कारवाई करावी."
सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मी छोट्या लेव्हलच्या विषयांना हाताळते. मी पहिलं पत्र लिहिलं होतं आणि जिथे व्यक्त व्हायचं तेव्हा व्यक्त झाले. नागपुरात माध्यमांना देखील माझं मत सांगितलं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं तपास होईल आणि हयगय करणार नाही. मी मंत्री आहे, अशात आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मोर्चा काढत असू तर आपणच आपल्या सरकारवर अविश्वास दाखवतोय असा अर्थ होईल."
ही बातमी वाचा: