मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मनसेनं या बिहार भवनला विरोध केला असून बिहार भवन होऊ देणार नसल्याचे नवनिर्वाचित नगरसेवकाने म्हटलं आहे.

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये यंदा सगळ्यांचं लक्ष मुंबई (Mumbai) महापालिकडे लागले होते. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याने यंदाच्या निवडणुकीत मराठीचा मुद्दा चांगलाच गाजला. त्यातच, राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन, मुंबई गुजरातला नेण्यावरुन रान पेटवलं होतं. त्यामुळे, मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय असाच सामना महापालिका निवडणुकी रंगल्याचं दिसून आलं. मात्र, ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका आपल्याकडे ठेवता आली नाही. मुंबई महापालिकेत (Mahapalika) भाजप सर्वाधिक जागांसह मोठा पक्ष ठरला, तर महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं. एकीकडे भाजपने मुंबई महापालिकेत वर्चस्व मिळवलं असताच, मुंबईत बिहार भवन उभारण्याची घोषणा नितीश कुमार यांच्या सरकारने केली आहे. मात्र, मनसेनं (MNS) या बिहार भवनला विरोध केला असून बिहार भवन होऊ देणार नसल्याचे नवनिर्वाचित नगरसेवकाने म्हटलं आहे.
बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, या माध्यमातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बिहार राज्याची प्रशासकीय आणि सामाजिक उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील बिहारवासीयांसाठी एक मोठे आधारकेंद्र ठरणार आहे. मात्र, आता या बिहार भवनला मनसेनं विरोध केला आहे.
आम्ही मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही, महागाई वाढली आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून नको त्या गोष्टीत पैसे घालवतात, अशा शब्दात मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने बिहार भवनला थेट विरोध केला आहे. मुंबईत बिहार भवन बांधण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही खर्च करा ना, इथे आमचे प्रश्न सुटत नाही, तुम्ही तुमचे प्रश्न सोडवा, असे यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं. तसेच, निवडून आलेले नगरसेवक हे कट्टर आहेत, जे गद्दार आहेत ते आधीच निघून गेले आहेत. त्यामुळे, ऑपरेशन टायगर वगैरे सगळं फेल आहे, असे म्हणत कुठलाही नगरसेवक फुटणार नसल्याचेही किल्लेदार यांनी स्पष्ट केले.
मुंबईत 30 मजली बिहार भवन
प्रस्तावित बिहार भवन 30 मजली असणार असून, बेसमेंटसह या इमारतीची एकूण उंची सुमारे 69 मीटर इतकी असणार आहे. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी STP प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र या सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
हेही वाचा
मोठी बातमी : मुंबईत बिहार भवन उभारणार, 30 मजली टोलेजंग इमारत, नितीश सरकारचा मोठा प्लॅन























