Maratha Reservation : बीडमध्ये तब्बल 22 लाख अभिलेखे तपासले; कुणबीच्या 3 हजार 993 नोंदी आढळल्या
Maratha Reservation : समितीने घालून दिलेल्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात 12 विभागांच्या 47 प्रकारच्या अभिलेखांमधून मराठा-कुणबी नोंद तपासण्याचे काम होत आहे.
बीड : मराठा समाजास मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) आणि समिती सदस्यांनी शनिवारी (28 ऑक्टोबर) रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात एका बैठकीत विविध विभागांच्या माहितीचा आढावा घेतला. यावेळी बीडमध्ये वेगवेगळ्या विभागाने तब्बल 22 लाख अभिलेखे तपासले असून, ज्यात कुणबीच्या 3 हजार 993 नोंदी आढळल्या असल्याची माहिती समितीला देण्यात आली.
बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी समितीसोबतच्या बैठकीत पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे आतापर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. सर्व यंत्रणांनी व्यवस्थितपणे आपापल्या अभिलेखात नोंदीची तपासणी करावी. मोडी तसेच उर्दू भाषेतील नोंदीचे तज्ञांकडून भाषांतर करून येत्या 5 दिवसात परिपूर्ण अशी आकडेवारी सादर करावी, अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्त आर्दड यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
सर्व अभिलेखे 1967 पूर्वीचे आहेत.
समितीने घालून दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात 12 विभागांच्या 47 प्रकारच्या अभिलेखांमधून मराठा-कुणबी नोंद तपासण्याचे काम होत आहे. यात एकूण चार विभागाकडे 20 लाख 35 हजार 887 अभिलेखे तपासण्यात आले. हे केवळ चार विभागांचे आहेत. इतर 8 विभाग मिळून यात 22 लाखाहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या. या चार विभागाचे अभिलेखांच्या तपासणी 3 हजार 993 कुणबी-मराठा नोंदी आढळल्या आहेत. हे सर्व अभिलेखे 1967 पूर्वीचे आहेत.
सर्वात जुना अभिलेख 1910 सालचा...
तपासणी दरम्यान सर्वात जुना अभिलेख 113 वर्षे जुना आहे. तो 1910 सालच्या शिक्षण विभागाचा अभिलेख आहे. याची पाहणी समितीने केली. आढळून आलेल्या नोंदीची काही अभिलेखांच्या आधारे तपासणी या बैठकीत करण्यात आली. समितीच्या आढावा बैठकीनंतर नागरिकांनी सादर केलेले पुरावे, दावे स्वीकारण्यात आले. 122 जणांनी समिती पुढे आपले निवेदन सादर केले. बैठकीत प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी आभार मानले.
बैठकीत यांची उपस्थिती...
यावेळी समितीचे सदस्य सचिव व विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, न्याय व विधी सहसचिव सुभाष कराळे, उपायुक्त सामूहिक सामान्य प्रशासन जगदीश मणियार, विशेष कार्य अधिकारी शिवाजी शिंदे, अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदींची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; आणखी दोन महिने आरक्षण मिळणे अवघड?