(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंगलकार्यात राहण्याची सोय, 175 एकरमध्ये सभा, 200 एकरात पार्किंग; मनोज जरांगेच्या मेळाव्याला मराठे पुन्हा एकवटणार!
दसरा मेळाव्याला येणाऱ्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल.
बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले आहे. मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील दसऱ्याला भव्य मेळावा घेणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून याची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे. नारायणगडावर 175 एकर मैदानात हा मेळावा होणार असून 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था केली आहे. दरम्यान झालेल्या बैठकीत वीस लाखांचा निधी प्राप्त झालाय. तर मुस्लिम समाजानेही देणगी दिली आहे.
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नारायणगडावर या : मनोज जरांगे
राज्यातील मराठयांची इच्छा होती दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यासाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे, जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला तुफान पोर येणार आहेत. कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा आहे. दसरा मेळावा आहे पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नारायणगडावरील दसरा मेळाव्याला या, असे मनोज जरांगे म्हणाले.
राज्यात तीन मेळावे दरवर्षी गाजतात
राज्यात शिवसेनेचा दसरा मेळावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा गाजत आलेला आहे. मुंडे यांनी जिल्ह्याच्या सीमेवर भगवान गडावर दसरा मेळावा सुरू केला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर ही परंपरा पंकजा मुंडे यांनी सावरगावात भगवान भक्ती गडावर सुरू ठेवली आहे. माजी आमदार सुनील धांडे यांनी नारायण गडावर दसरा मेळावा सुरू केला होता. मात्र त्यानंतर त्यात खंड पडला. दिवंगत विनायक मेटे यांनी पुढे या दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवली. पण मेटे यांच्या निधनानंतर हा दसरा मेळावा बंद झाला.
हे ही वाचा :
मनोज जरांगे आंदोलनाची वात पुन्हा पेटवणार, डिस्चार्ज मिळताच बैठकांचा धडाका; मराठवाडा पिंजून काढणार