Dhananjay Munde : मंत्री झाल्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात; समर्थकांकडून शक्तिप्रदर्शनाची शक्यता
Dhananjay Munde in Beed : परळी शहरात सभेसाठी भव्य अशा दीडशे बाय तीनशे वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Dhananjay Munde in Beed : मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बीड (Beed) जिल्ह्यात गुरुवारी (13 जुलै) रोजी पहिल्यांदाच येणार आहे. त्यामुळे मुंडेंच्या स्वागतासाठी जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत केले जाणार आहे. सोबतच परळी शहरात भव्य अशा दीडशे बाय तीनशे वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जवळपास दहा हजाराहून अधिक लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली. तसेच परळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पन्नास फुटी बॅनर झळकत आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पहिल्यांदाच परळीत इतके मोठे बॅनर्स लागलेले पाहायला मिळत आहेत.
गुरुवारी सकाळी 11 वाजता धनंजय मुंडे यांचे कडा येथे पोहोचणार आहे. येथून निघाल्यावर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते सायंकाळी सात वाजता परळीत दाखल होतील. यावेळी परळीतील कृषी बाजार समितीच्या कॉटन मार्केट मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडसह परळीत येणार असल्याने त्यांच्या जाहीर सभेतून ते नेमकं काय बोलणार? याकडेच लक्ष लागले आहे.
असा असणार मुंडेंचं बीड दौरा...
- कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे 13 जुलै रोजी सकाळी मुंबई येथून निघून दुपारी आष्टी तालुक्यातील कडा येथे पोहोचतील.
- आष्टी मतदारसंघाच्या वतीने आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह समर्थकांच्या वतीने स्वागत होईल.
- त्यानंतर मुंडे हे श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.
- त्यानंतर पाटोदा, मांजरसुंबा व बीड, वडवणी, तेलगाव, धारुर, केज, अंबाजोगाई येथे स्वागत सत्कार होणार आहे.
- त्यानंतर सायंकाळी नाथ रोडवरील यात्रा मैदानावर धनंजय मंडे यांचा सत्कार, जाहीर सभा होत असून मतदारसंघासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहतील.
जोरदार शक्तिप्रदर्शन होणार?
बीड जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण-भावाचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर धनंजय मुंडे मंत्री झाले होते. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता गेली. त्यामुळे मागील वर्षभरापासून धनंजय मुंडे विरोधकांच्या भूमिकेत होते. पण अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीचा एक गट घेऊन भाजपसोबत हातमिळवणी केली. तर धनंजय मुंडे देखील अजित पवारांच्या गटात सहभागी झाले आणि त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. दरम्यान मंत्री झाल्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात परत येत आहेत. त्यामुळे यानिमित्ताने धनंजय मुंडे समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: