Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या गालावरुन वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडली; भगवानगडाच्या नामदेव शास्त्रींकडून पुन्हा पाठराखण
Dhananjay Munde: भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं दिसून आलं आहे.

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केली. त्याच दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे भगवानगडावर गेले होते. त्यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी असल्याची म्हटले होते. त्यानंतर शास्त्री यांच्यावर देखील टीका झाली होती, त्यानंतर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवान गडावर जाऊन भेट घेतली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे. म्हणून तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका. मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांच्या गालावरून वारे गेले आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली. ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावं एवढेच बोलू, असेही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे, तसेच नारळी सप्ताहाला धनंजय मुंडे उपस्थित का राहिले नाही याचे कारण ही महंतांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे आज आपल्या कार्यक्रमाला येणार होते. मात्र त्यांना हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही, म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला, असं कारण नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे. दोन तास हेलिकॉप्टरची परवानगी मिळाली नाही असंही ते पुढे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले नामदेव शास्त्री?
मी आता फेटा बांधायला गेलो तेव्हा मला फोन आला होता. बीडचे भुमीपूत्र धनंजय मुंडे हे येणार होते, दोन तास ते हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले मात्र, त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही, त्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांचा दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टर उडण्यासाठी जी परवानगी लागते ती मिळाली नाही. पण काही हरकत नाही, आपण त्यांना भगवान गडाचे जाहीर केले असल्यामुळे मला वाटतं आहे की जी त्यांच्या गालावरून वार गेलं आहे त्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा, त्यांची एवढी चांगली वाणी बंद पडली आहे, ती चालू करा आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन त्यांच्या हातून समाजकल्याण घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया असंही ते पुढे म्हणाले आहेत.
दौरा रद्द का झाला?
माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या सोशल मिडिया एक्सवरून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे. श्री क्षेत्र भगवानगड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेर वासियांची हृदहपूर्वक क्षमा मागतो", अशी माहिती मुंडेंनी दिली आहे.






















