संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ रेणापुरात जनसमुदाय उसळला; मुंडे भावंडाच्या राजीनाम्यासह आक्रोश मोर्च्यातून 7 प्रमुख मागण्या
Beed Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ या आज लातूरच्या रेणापूर मध्ये विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्याच्या मार्फत मुख्यत्वे सात मागण्या करण्यात आल्या आहेत.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून जवळ जवळ सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. अशातच आज(27 डिसेंबर) या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक या आक्रोश मोर्चात सहभागी झाले आहेत. रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असे या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान विविध सामाजिक संघटनांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. अशातच संतोष देशमुख यांची कन्या ही देखील या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे. या मोर्च्याच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना निवेदन देण्यात आला आहे. यात मुख्यत्वे सात मागण्या करण्यात आल्या आहेत.
आक्रोश मोर्च्यातून 'या' 7 प्रमुख मागण्या
1) मुख्य आरोपींसह कटाचा सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
2) सदरचे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी.
3) सदरील संतोष देशमुख यांच्या पिडीत कुटूंबियांना व दहशती खाली असणाऱ्या मस्साजोग येथील ग्रामस्थांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
4) संतोष देशमुख यांच्या कुटूंबियातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत समावून घेण्यात यावे.
5) सदरील खुन प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत मुंडे कुटुंबाकडे असलेल्या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा.
6) सदरील घटनेचा गुन्हा नोंद करुन घेण्यास टाळाटाळ करून व विलंब करुन आरोपीस मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करुन, त्यांना या खुनामध्येसह आरोपी करण्यात यावे.
7) परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.
लातूरच्या रेणापुरात जनसमुदाय उसळला
लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणातून निघालेला हा मोर्चा रेणापूरच्या तहसील कार्यालयापर्यंत अतिशय शांततेत दाखल झाला. मोर्चेकरांच्या हातात विविध फलक होते. फास्टट्रॅक कोर्टात प्रकरणाचा तात्काळ निकाल लावावा. दूषींना तात्काळ अटक करण्यात यावी. मंत्रीपदावरून बहीण भावांना काढण्यात यावे. मृत सरपंच संतोष देशमुख यांना तात्काळ न्याय द्यावा. अशा मागण्यांचे फलक घेतलेले लोक मोर्चात सहभागी झाले होते.
हे ही वाचा