Beed News : सुनेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या सासऱ्याचा बीड-नगर महामार्गावर अपघाती मृत्यू
Beed News : सुनेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या सासऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड-अहमदनगर महामार्गावर घडली.
Beed News : काही महिन्यांपूर्वी घरात चिमुकला सदस्य येण्याची बातमी कळली, मग डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठरला. घरात आनंदाचं वातावरण असताना एक बातमी आली या आनंदावर विरजण पडलं आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुनेच्या (Daughter-in-Law) डोहाळे जेवणाच्या (Baby Shower) कार्यक्रमाला जाणाऱ्या सासऱ्याचा (Father-in-Law) अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड-अहमदनगर महामार्गावर (Beed Ahmednagar Highway) घडली. रामदास मिसाळ असं मृत सासऱ्याचं नाव आहे.
शिवशाही बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक
रामदास मिसाळ यांचा बीड-अहमदनगर रस्त्यावर धानोराजवळ अपघातात मृत्यू झाला. गुरुवारी (29 डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. ते आपल्या सुनेच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जामखेडहून अहमदनगरकडे जात होते. याचवेळी शिवशाही बस आणि दुचाकीचा अपघात झाला. यातच रामदास मिसाळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ते जामखेड तालुक्यातील आनंदवाडी इथले रहिवासी होते.
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात
रामदास मिसाळ हे दुचाकीवरुन जामखेडहून अहमदनगरकडे जात होते. बीड-अहमदनगर महामार्गावरील धानोराजवळ रामदास मिसाळ हे समोरील गाडीला ओव्हरटेक करत होते. त्याचवेळी पुण्याहून नांदेडला जात असलेली शिवशाही बस समोरुन आली. यावेळी दुचाकी आणि शिवशाही बसची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार रामदास मिसाळ यांनी जागीच प्राण सोडले.
या घटनेनंतर तात्काळ अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या घटनेचा पंचनामा करुन रामदास मिसाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. परंतु घरात आनंदाचा सोहळा असताना रामदास मिसाळ यांच्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
बीड-अहमदनगर महामार्गाची दूरवस्था, अपघातात अनेकांनी जीव गमावला
दरम्यान, मागील काही दिवसांपासून बीड-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातच गेल्या चार दिवसात या रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचं काम तात्काळ करण्यात यावं अशी मागणी आता नागरिक आणि प्रवासी करत आहेत.
वडिलांचे क्रियाकर्म आटोपून येत असताना कुटुंबावर काळाचा घाला
वडिलांच्या मृत्यूनंतर क्रियाकर्म आटोपून येणाऱ्या कुटुंबावर काळाने घातला होता. बीडमध्ये जून महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली होती. अंबाजोगाईकडे येत असलेल्या रिक्षाला एका भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील तीन प्रवासी आणि रिक्षाचालकासह चौघांचा मृत्यू झाला होता. तर पाच प्रवासी जखमी झाले होते.