Beed : बीडमध्ये कहर! आठ वर्षांपूर्वी लाखो खर्चून स्मशानभूमी उभारली, पण अद्याप एकही अत्यसंस्कार नाही, नेमकं प्रकरण काय?
Beed Mahajanwadi Cemetery : सगळ्याच गोष्टीत पैसे खायची सवय झालेल्या राजकारण्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी ही स्मशानभूमी उभारली आहे का असा प्रश्न महाजनवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला.

बीड : जगतानाही मरणयातना भोगणारे लोक काही कमी नाहीत. मायबाप सरकार, प्रशासन जगताना काही मदत करत नाही, किमान मेल्यानंतर तरी त्या जीवाचं अंत्यसंस्कार चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची मागणी केली जाते. बहुतांश ठिकाणी तशीही सुविधा मिळत नाही हे दुर्दैव. पण गावाला लाखोंचा खर्च करुन स्मशानभूमी देऊनही त्या ठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून जर एकही अंत्यसंस्कार केलं जात नसेल तर काय? ही अतिशयोक्ती नाही, बीडमधील एका गावाची हीच परिस्थिती आहे. पण यामागचं कारण मात्र वेगळं आहे.
बीड जिल्ह्यात एकीकडे 656 गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याचा प्रकार अनेकदा समोर आला. तर दुसरीकडे बीड तालुक्यातील महाजनवाडी गावातील स्मशानभूमीची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या गावात आठ वर्षांपूर्वी स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. परंतु या स्मशानभूमीत आतापर्यंत एकही अंत्यसंस्कार झालेले नाही. त्यामुले स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेला लोखंडी ढाचा देखील गायब आहे.
स्मशानभूमी गावापासून अडीच किमीवर उभारली
महाजनवाडी येथे आठ वर्षांपूर्वी 8 लाख रुपये खर्च करून स्मशानभूमी बांधण्यात आली. या गावची लोकसंख्या जवळपास दोन हजार एवढी आहे. परंतु उभारण्यात आलेल्या या स्मशानभूमीचे अंतर गावापासून अडीच किलोमीटर इतके दूर आहे. त्यामुळे मेलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे असतील तर ते अडीच किमीवर जाऊन स्मशानभूमीत करावे लागतात.
नेमक्या याच कारणामुळे ही स्मशानभूमी वापरातच आली नाही. या गावात कुणाचेही निधन झाले तर ग्रामस्थ पार्थिवावर गावाशेजारीच, उघड्यावर अंत्यसंस्कार करतात. हीच गोष्ट ग्रामस्थांच्या सोईची आहे.
खाबुगिरीलाही कुठेतरी मर्यादा असावी
गावामध्ये स्मशानभूमीची गरज आहे, पण ती जर गावाशेजारी न बांधता तब्बल अडीच किलोमीटर अंतरावर बांधली तर त्याचा वापर कोण करणार? अडीच किमीवर बांधलेली स्मशानभूमी ही गावकऱ्यांच्या सोईसाठी बांधलीय की ती कंत्राटदारांच्या फायद्यासाठी असाही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्येक गोष्टीत खाबुगिरी करणाऱ्या प्रशासनाने पैसे नेमके कुठे खायचे याला तरी मर्यादा ठेवावी असं गावकऱ्यांचं मत आहे.
शासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
बीडमध्ये 1394 गावांपैकी 656 गावांकडे स्मशानभूमी नाही. त्यामुळे त्या गावांमध्ये पावसाळ्याच्या वेळी अत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. पण महाजनवाडीमध्ये बांधण्यात आलेली स्मशानूमी म्हणजे शासनाच्या पैशाचा अपव्यय आहे, शासनाच्या अनागोंदी कारभाराचं उदाहरण असल्याचं गावकरी म्हणतात.
ही बातमी वाचा:























