Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: तारा भवाळकरांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मंचावर नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड थांबवा!
Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच तपोवन वृक्षतोडीवर भाष्य केले.

Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला मोठ्या प्रमाणावर वेग आला असून, साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन (Tapovan) परिसरातील 1150 एकरांवर साधूग्राम (Sadhugram) उभारण्याची योजना आहे. या कामासाठी 1800 झाडांची तोड (Nashik Tree Cutting) प्रस्तावित असल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींच्या तीव्र नाराजीचा उद्रेक झाला आहे. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर (Tara Bhawalkar) यांनी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरच तपोवन वृक्षतोडीवर भाष्य केले आहे.
Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: तपोवनावरील कुऱ्हाड थांबवा : तारा भवाळकर
तारा भवाळकर म्हणाल्या की, तपोवनावर कुऱ्हाड पडत आहे, असे अक्षरशः वातावरण निर्माण होत आहे. तिथे चळवळ सुरु आहे. प्रचंड विरोध होत आहे. सामान्य नागरिकांपासून अभिजनांपर्यंत सगळे विरोध करत आहेत. कारण प्रकृती टिकली तर आपण प्रकृतीचा भाग असलेले माणसं टिकणार आहोत. प्रकृतीमध्ये जी पंचतत्वे मानतो, ही झाडांच्या पानांच्या पृथ्वी, आग, पाणी, वायू, आकाश ही सगळी झाड, पानं, मातीच्या आश्रयाने जगतात आणि म्हणून आपण जगतो. कारण आपण प्रकृतीचा एक अंश असतो. आपल्याला स्वार्थ म्हणून देखील जगायचं असलं तरी वनांचे जतन हे केले पाहिजे नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्राण टिकणे अवघड होईल, असे त्यांनी म्हटले.
Tara Bhawalkar : कोवळ्या मनावर अन्य भाषांचे ओझे लादणे अयोग्य : तारा भवाळकर
दरम्यान, प्राथमिक स्तरावर शिकणाऱ्या मुलांच्या कोवळ्या मनावर अन्य भाषांचे ओझे लादणे अयोग्य आहे. मुलांच्या नैसर्गिक विकासासाठी त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळणे गरजेचे असून, मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांची सक्ती त्यांच्यावर करू नका, असा सल्ला देखील डॉ. तारा भवाळकर यांनी दिला. डॉ. भवाळकर यांनी मराठी भाषेच्या जागतिक विस्तारावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, मराठी भाषा आज देश, धर्म आणि जातीच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहोचली आहे. मराठी माणूस जिथे गेला, तिथे त्याने आपली संस्कृती आणि भाषा रुजविली आहे, याची दखल घेणे आवश्यक आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाला हे उत्तमच झाले, पण आता मराठी साहित्य आणि भाषेच्या निर्मितीसाठी आपण काही ठोस पायाभूत काम करणार आहोत का? असा सवाल त्यांनी केला. अध्यक्षीय कारकीर्दीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, समूहाच्या भावनांना व्यासपीठ मिळवून देणे, हेच माझे कार्य राहिले आणि त्यामुळेच माझे विचार सर्वसामान्यांना आपले वाटले, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा























