Beed News: पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला, मराठा Vs वंजारी संघर्ष टोकाला, निवडणूक संपल्यानंतरही बीड जिल्हा का धुमसतोय?
Beed News: बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये बंद पाळला जात आहे. परळी, वडवणी, पाथर्डी, शिरुर कासार या भागांमध्ये बंद पाळण्यात आला होता. आज केज तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
बीड: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर मतदान झाले आणि मतदानानंतर निकालही लागला अगदी याच निकालानंतर देशात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तारूढ झाले. मात्र तिकडे बीडमध्ये काही केल्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) संघर्षाचे परिणाम थांबायला तयार नाहीत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा निसटता पराभव झाला आणि त्यानंतर जिल्ह्यात सोशल मीडियावर पुन्हा संघर्ष निर्माण झाला. सध्या रोज एका शहरात बीड जिल्ह्यात (Beed District) बंद पाळला जातोय. त्यामुळे बीड जिल्ह्यात प्रचंड तणाव पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर होत आहेत त्याच्या विरोधामध्ये वडवणी शहर बंद करण्यात आले होता. वडवणी शहरातील वंजारी समाजातील समाज बांधव रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. पाथर्डी त्यानंतर शिरूर त्यानंतर परळी आणि आता वडवणी शहर बंद करण्यात आले. मराठा विरुद्ध वंजारी हा संघर्ष बीड जिल्ह्यात केवळ निवडणुकीपुरता राहिला नाही तर निवडणुकीनंतर सुद्धा त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पंकजा मुंडेचा साडेसहा हजार मतांनी पराभव झाला आणि हा पराभव लोकांच्या इतका जिव्हारी लागला की, आतापर्यंत दोघाजणांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर दहा वर्ष प्रीतम मुंडे या खासदार राहिल्या. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला हा पराभव वंजारी समाजातील बांधवांसाठी मोठा भावनेचा विषय बनला आहे. हा पराभव अंतिम नाही, असे सांगत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनीही समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
मनोज जरांगेंवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
एकीकडे वंजारी समाज रस्त्यावर उतरून बंद पाळत असतानाच मराठा समाजाने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली असून पंकजा मुंडे यांच्या समर्थक हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये खालच्या भाषेमध्ये टीका टिप्पणी करत असल्याची तक्रार बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बीड पोलिसांनी रोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये अपशब्द काढणाऱ्या 15 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
खरंतर प्रचारापासून बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी समाज असा संघर्ष सोशल मीडियावर सुरू झाला होता यावर बीड पोलिसांनी सुरुवातीपासूनच कारवाई करायला सुरुवात केली होती. सोशल मीडियावर कायम वादग्रस्त लिखाण करणाऱ्या बीड जिल्ह्यातील निकालाच्या वेळी किमान 500 जणांना नोटीस बीड पोलिसांनी बजावली होती. निकाल लागल्यानंतर सुद्धा रोज सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट येत आहेत मागच्या दोन दिवसात बीड पोलिसांनी अशा वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या बारा जणांच्या विरोधात कारवाई केली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक मनोज जरांगे यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा मोठा परिणाम झाला. यापूर्वी सद्धा बीड जिल्ह्यामधल्या निवडणुकीमध्ये वंजारी वर्सेस मराठा हा जातीय संघर्ष व्हायचा. मात्र, या निवडणुकीमध्ये या संघर्षाने टोक गाठल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. आता निवडणूक संपली असली तरी हा संघर्ष मात्र काही केल्या कमी होताना पाहायला मिळत नाही, असे दिसत आहे.
आणखी वाचा
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव, बीड जिल्ह्यात तणाव कायम, आता केज शहर बंदची हाक