Beed Crime : तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण, 14 तासात आरोपीला बेड्या
Beed Crime : बीड जिल्ह्यात तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीला आष्टी पोलिसांनी अवघ्या 14 तासात अटक केली आहे.
Beed Crime : बीड (Beed) जिल्ह्यात तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी (Extortion) अल्पवयीन मुलीचं अपहरण (Kidnap) करणाऱ्या आरोपीला आष्टी पोलिसांनी अवघ्या 14 तासात अटक केली आहे. आकाश बंडगर (वय 26 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. त्याने आष्टीतील एका कॉन्ट्रॅक्टरच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर आष्टी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन रविवारी दुपारी (26 मार्च) भिगवण परिसरातून अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक केली असून अल्पवयीन मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली आहे.
नेमकं काय घडलं?
बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचं शनिवार 25 मार्च रोजी रात्री अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलीच्या वडिलांकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची मागणी करताना आरोपींनी मुलीच्या वडिलांना वारंवार वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन करायला सुरुवात केली. मुलीचं अपहरण झाल्याचं समजल्यानंतर वडिलांनी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. घटनेचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात अपहणाचा गुन्हा दाखल केला. अपहरण झालेल्या मुलीचे वडील हे आष्टीमधील कंत्राटदार आहेत.
पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे फिरवली. मुलीच्या वडिलांना आलेल्या फोनवरुन आणि इतर गोपनीय तपास करुन आष्टी पोलिसांनी आरोपीच्या शोधात थेट भिगवण गाठले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. आम्ही पैसे घेऊन भिगवण-इंदापूर रस्त्यावर उभं असल्याचं त्यांनी आरोपीला कळवलं. आरोपी पैसे घेण्यासाठी येताचा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल अवघ्या 14 तासांत भिगवण इथून आरोपी आकाश बंडगर याला बेड्या ठोकल्या. तर त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुखरुप सुटका पोलिसांनी केली आहे. या मुलीला एका हॉटेलमध्ये खोलीत कोंडून ठेवलं होतं. पोलिसांनी तिची सुटका करत वडिलांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांचं कौतुक
दरम्यान, अपहरणचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 14 तासातच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपीला अटक केली आणि मुलीची सुखरुप सुटका केल्याने बीड पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, पोलीस अंमलदार शिवप्रकाश तवले, पोलीस नाईक विकास जाधव, महिला पोलीस हवालदार स्वाती मुंडे, पोलीस अंमलदार सचिन कोळेकर यांनी ही कामगिरी केली.