अरे आवाज कुणाचा!... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुलाल कुणी उधळला? निकाल हाती; वाचा कुठे कोण नगराध्यक्ष?
संभाजीनगरच्या 6 नगरपरिषद आणि एक नगरपंचायतिची मतमोजणी पार पडली असून निकाल हाती आले आहेत. पाहूया कुठे कोणी गुलाल उधळला?

Chhatrapati Sambhajinagar Nagarparishad Election Results 2025: मराठवाड्यातील 52 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, पैठण, खुलताबाद, गंगापूर या 4 महत्त्वाच्या नगरपरिषदांसाठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडे सर्वाधिक नगराध्यक्षपदं आणि नगरपालिका राहणार याकडेही लक्ष आहे. संभाजीनगरच्या 6 नगरपरिषद आणि एक नगरपंचायतिची मतमोजणी पार पडली असून निकाल हाती आले आहेत. पाहूया कुठे कोणी गुलाल उधळला?
खुलताबाद
खुलताबादमधील 17 प्रभागांमध्ये मतमोजणी पार पडली असून नगराध्यक्ष पद काँग्रेसच्या अमीर पटेल यांना मिळालं आहे. 2017 मध्ये झालेल्या खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीतही काँग्रेसचेच एस. एम . कमर विजयी नेते ठरले होते. या निवडणुकीतही नगराध्यक्ष पद काँग्रेसच्या पारड्यात पडलं आहे . खुलताबाद नगरपरिषदेत काँग्रेसच्या चार जागा निवडून आल्या आहेत. भाजपचे 7 उमेदवार विजयी ठरले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 9 उमेदवार निवडून आले आहेत.
गंगापूर
गंगापूर नगर परिषदेत 17 प्रभाग असून सर्वाधिक उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संजय जाधव यांना मिळालं आहे. अजित पवार गटाचे एकूण 11 उमेदवार गंगापूरनगर परिषदेतून निवडून आले असून भाजपचे 7 , शिवसेना उबाठा गटाचा एक तर अपक्ष एक उमेदवार निवडून आला आहे. 2017 मध्ये झालेल्या गंगापूर नगर परिषदेत भाजपच्या वंदना पाटील जिंकल्या होत्या.
फुलंब्री
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत यंदा मतदारांनी स्पष्ट कौल देत महाविकास आघाडीच्या राजेंद्र ठोंबरे यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या राजेंद्र ठोंबरे यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे सुहास शिरसाट यांचा 1797 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पटकावलं आहे. 2017 च्या नगरपंचायत निवडणुकीत 190 मतांनी राजेंद्र ठोंबरे यांचा पराभव झाला होता. एकूण 17 नगरसेवकांच्या जागांसाठी काँग्रेसला चार जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक जागा, उभाठा गटाचे 7 व भाजपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. 17 नगरसेवकांच्या जागांपैकी महाविकास आघाडीला सर्वाधिक 12 जागा मिळाल्या आहेत त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
पैठण
पैठणच्या 23 प्रभागांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं 17 जागांवर गुलाल उधळला आहे. भाजपची केवळ एक जागा निवडून आली आहे.तर अजित पवार गटाचे दोन व काँग्रेसचे चार उमेदवार जिंकले आहेत. पैठणचा नगराध्यक्षपदावर शिंदे सेनेच्या विद्या कावसनकर यांनी नाव कोरले आहे. 2017 मध्ये पैठण नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या सुरज लोळगे यांना विजय मिळाला होता.
सिल्लोड
सिल्लोडच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे समीर अब्दुल सत्तार विजयी ठरले आहेत. सिल्लोड मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 25 जागा तर भाजपच्या एकूण तीन जागा निवडून आल्या आहेत. भाजपने ही लढत प्रतिष्ठेची मानून सत्तारांची सत्ता उलथवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. तरीही स्थानिक राजकारणातील सत्तारांचा दबदबा भाजप मोडू शकला नाही. अखेर मतदारांनी सत्तारांच्या ‘सिल्लोड पॅटर्न’वर पुन्हा एकदा विश्वास दाखवला.
वैजापूर
वैजापूरच्या नगराध्यक्षपदी भाजपचे दिनेश परदेशी यांनी दणदणीत विजय मिळवलाय. त्यांनी आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा 6,248 मतांनी पराभव केलाय. वैजापूरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत कडवी टक्कर झाल्याचं दिसतंय. शिंदेंच्या शिवसेनेचे 10 उमेदवार निवडून आलेत. तर भाजपचे 11 उमेदवार विजयी ठरले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आहेत.
कन्नड
कन्नड नगरपरिषदेतील एकूण 23 प्रभागांमध्ये काँग्रेसच्या शेख फरीन बेगम नगराध्यक्ष झाल्या आहेत. कन्नड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 12 जागा जिंकले असून भाजप तीन काँग्रेस सहा शिंदेंची शिवसेना तीन तर अपक्ष एक जागा निवडून आली आहे.
छत्रपती संभाजीनगर मधील 7 नगर परिषदेतील नगरसेवक
•काँग्रेस- 18
•भाजपा-37
•राष्ट्रवादी अजित पवार -38
•शिंदेशिवसेना- 55
•उबाठा-09
•शरद पवार एनसीपी- 01
•अपक्ष -02
एकूण-160 नगरसेवक





















