पन्हाळ्यापासून शिरोळपर्यंत ते चंदगडपासून हातकणंगलेपर्यंत! कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 नगराध्यक्षांना कोणत्या पक्षातून आघाडीतून गुलाल लागला? यादी एकाच ठिकाणी
Kolhapur District Nagaradhyaksha Winner List: कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे युतीला सुद्धा घवघवीत यश मिळालं आहे. कागल नगरपरिषदेत त्यांनी सर्व जागा जिंकत शिंदे गटाला व्हाॅईटवाॅश दिला.

Kolhapur District Nagaradhyaksha Winner List: कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचा मुरगूड, जयसिंगपूर, हातकणंगले आणि कुरुंदवाडमध्ये नगराध्यक्षपदी विजय खेचून आणला आहे. भाजपला चंदगड, आजरा आणि हुपरीमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला पेठवडगाव आणि शिरोळमध्ये यश मिळालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कागल आणि चंदगडमध्ये विजय मिळवला आहे. मलकापूर आणि पन्हाळामध्ये जनसुराज्यने विजय मिळवला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुका असल्या, तरी महायुतीचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, कागलमध्ये राजकीय भूकंप करणाऱ्या हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे युतीला सुद्धा घवघवीत यश मिळालं आहे. कागल नगरपरिषदेत त्यांनी सर्व जागा जिंकत शिंदे गटाला व्हाॅईटवाॅश दिला. शिरोळमध्ये आमदार अशोकराव माने यांची घराणेशाही मतदारांनी मोडीत काढल्याचे दिसून आले.
कागल नगरपरिषद
कागल नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता भैय्या माने यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी शिवसेना उमेदवार युगेंधरा घाटगे यांचा पराभव केला. कागलच्या नगराध्यक्ष सविता माने हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक भैय्या माने यांच्या पत्नी आहेत.
गडहिंग्लज नगरपरिषद
गडहिंग्लज नगरपरिषद नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या महेश महादेव तुरबतमठ यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजप, जनसुराज्य, जनता दल, शिवसेना शिंदे गट महा आघाडीचे उमेदवार गंगाधर राजशेखर हिरेमठ यांचा पराभव केला.
चंदगड नगरपंचायत
चंदगड नगराध्यक्षपदी भाजपच्या सुनिल काणेकर यांनी विजय मिळवला. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार दयानंद काणेकर यांचा पराभव केला. राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली होती.
शिरोळ नगरपरिषद
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत शिव शाहू यादव पॅनलच्या योगिता कांबळे यांनी विजय मिळवला. त्यांनी जनसुराज्य पक्षाचे आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाई सारिका माने यांचा पराभव केला. शिरोळचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्वेता काळे यानी धूळ चारली.
कुरूंदवाड नगरपरिषद
कुरूंदवाड नगरपरिषद निवडणुकीत शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी विजय संपादन केला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार योगिनी पाटील आणि भाजपच्या समीरा जोशी यांचा पराभव केला आहे.
पन्हाळा नगरपरिषद
पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीत जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार जयश्री पवार अपेक्षेप्रमाणे विजयी झाल्या. त्यांनी तीन अपक्ष उमेदवारांचा पराभव करत विजय मिळवला.
मलकापूर नगरपरिषद
मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत जनसुराज्य आणि भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रश्मी कोठवळे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव केला.
पेठवडगाव नगरपरिषद
पेठवडगाव नगरपरिषद निवडणुकीत यादव आघाडीने बाजी मारली. यादव आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या पोळ यांनी विजय मिळवला. त्यांनी जनसुराज्य पक्षाच्या प्रणिती सालपे यांचा पराभव केला.
जयसिंगपूर नगरपरिषद
अतिशय आटातटीच्या जयसिंगपूर नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यांनी राजर्षी शाहू आघाडीमधून नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार सुदर्शन कदम यांचा पराभव केला.
हुपरी नगरपरिषद
हुपरी नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपचे मंगलराव माळगे यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेना ठाकरे, अजित पवार राष्ट्रवादी, युवक क्रांती स्थानिक आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला.
हातकणंगले नगरपंचायत
हातकणंगले नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अजित पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला.
मुरगूड नगरपंचायत
मुरगूड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा झटका बसला. मुरगुड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या सुहासिनी प्रवीणसिंह पाटील विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीचे उमेदवार तस्लिम जमादार यांचा पराभव केला. तस्लिम जमादार ह्या माजी नगराध्यक्ष राजेखन जमादार यांच्या पत्नी आहेत.
आजरा नगरपंचायत
आजरा नगरपंचायत निवडणुकीत ताराराणी आणि भाजप आघाडीचे अशोक चराटी विजयी झाले. त्यांनी काँग्रेस आणि स्थानिक आघाडीचे उमेदवार संजय सावंत यांचा पराभव केला.
इतर महत्वाच्या बातम्या





















