Beed Crime: मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
Beed Crime: बोगस एन्काऊंटरपूर्वी पोलिसांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक होते. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाली होती, असे रणजीत कासले याने म्हटले.

Beed Crime News: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले(Ranjeet Kasle) यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते, असेही कासले यांनी म्हटले. रणजीत कासले यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन अनेक खळबळजनक दावे केले होते. मात्र, आता त्यांनी वाल्मिक कराड याच्या एनकाउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
रणजीत कासले काय म्हणाले?
अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, अशी बातमी मी टीव्हीवर बघितली. ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. एसआयटीची बसवायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा, तरच यामधून सत्य समोर येईल. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. मी म्हणालो, हे पाप माझ्याकडून होणार नाही. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, अशी वनटाईन ऑफर दिली जाते. तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या विभागाला बोलावून घेतले जाते. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करु शकतो. याच्यामध्ये दम आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील.
पोलिसांची चार लोकांची टीम आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक होते. बैठकीत विचार केला जातो, काय करायचं. त्यानंतर पाच-सहा जणांची दुसरी विश्वासू लोकांची टीम निवडली जाते, ती घटनास्थळी जाते. जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील. एक अधिकारी, दोन अंमलदार, हवालदार, अशी टीम असते. या सगळ्यांना 5 कोटी, 10 कोटी रुपयांची लम्पसम ऑफर दिली जाते. चौकशी झाली तरी आमचं सरकार आहे, आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करु, असे पोलसांना सांगितले जाते. अशाप्रकारे बोगस एन्काऊंटर होतो, असे रणजीत कासले यांनी म्हटले.
आणखी वाचा























