महिंद्रा खरेदी करू शकते 'या' अमेरिकन कंपनीचा प्लांट, उत्पादन वाढवण्याची तयारी सुरू
Mahindra & Mahindra: महिंद्राने गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत अनेक नवीन कार लॉन्च केल्या आहेत. मात्र बाजारातील मागणीनुसार कंपनी गाड्यांचे उत्पादन करू शकलेली नाही.
Mahindra & Mahindra: महिंद्राने गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत अनेक नवीन कार लॉन्च केल्या आहेत. मात्र बाजारातील मागणीनुसार कंपनी गाड्यांचे उत्पादन करू शकलेली नाही. अशातच आता कंपनी उत्पादन वाढवण्यासाठी अमेरिकन कार निर्माता जनरल मोटर्सचा तळेगाव प्लांट खरेदी करण्याचा विचार करत आहे.
एका रिपोर्टनुसार, याबाबतची चर्चा अद्याप पहिल्याच टप्प्यात आहे. महिंद्राच्या चाकण प्लांटपासून अवघ्या 20 किमी अंतरावर असलेल्या जीएमच्या प्लांटला महिंद्राच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा भेटी दिल्या आहेत. जनरल मोटर्स 2017 मध्ये भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडली असून तेव्हापासून आपला कारखाना विकण्याचा विचार करत आहे. 2020 मध्ये या प्लांटमधील निर्यात युनिटचे उत्पादन बंद करण्यात आले होते.
जीएमचा तळेगाव प्लांट सुरुवातीला चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सला विकत घ्यायचा होता. परंतु भारत सरकारने अधिग्रहणास परवानगी न दिल्याने हा करार रद्द करण्यात आला. ब्रिटीश ब्रँड एमजी मोटर देखील प्लांट घेण्याच्या शर्यतीत आहे. परंतु त्याच्या चिनी मालकीमुळे संपादन प्रक्रिया लांबणीवर पडू शकते.
अलीकडेच फोर्डने आपला साणंद प्लांट टाटा मोटर्सला 725.70 कोटी रुपयांना विकला आहे. जर महिंद्राने जीएमचा प्लांट खरेदी केला तर ही भारताची दुसरी कंपनी ठरेल जी विदेशी ब्रॅण्डची मालमत्ता खरेदी करेल. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा अँड महिंद्रा हा प्लांट सुमारे 600 कोटी रुपयांना खरेदी करू शकते, जो कंपनीसाठी फायदेशीर करार ठरू शकतो.
महिंद्र या प्लांटला इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुविधेत रूपांतरित करण्याचा विचार करू शकते. कारण कंपनीचे प्रति वर्ष 2,00,000 ईव्ही विकण्याचे उद्दिष्ट आहे. 2027 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे कंपनीने लक्ष ठेवलं आहे. दरम्यान, नुकत्याच लाँच झालेल्या Mahindra Scorpio-N ने पहिल्या 30 मिनिटांत 1 लाखाहून अधिक बुकिंग मिळवून भारतातील सर्व SUV ला मागे टाकले आहे. एका रिपोर्टनुसार, महिंद्राकडे जवळपास 1.25 लाख कार डिलिव्हरी बाकी आहेत. महिंद्रा आपल्या SUV ची मागणी पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. अशातच उत्पादन क्षमता वाढल्याने कारची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या :