Ideas of India Summit 2023 : देशात स्वस्त इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करुन देण्यासाठी मारुती प्रयत्नशील : शशांक श्रीवास्तव
Ideas of India Summit 2023 : मारुती सुझुकी देशातील इलेक्ट्रिक वाहन घटकांच्या निर्मितीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे, ज्यामुळे त्यांच्या किमती आगामी काळात कमी होतील.
Ideas of India Summit 2023 : आगामी काळात देशातील नागरिकांना स्वस्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करता यावीत यासाठी मारूती प्रयत्नशील आहे, त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात येईल असं मारुती कंपनीचे मार्केटिंग हेड शशांक श्रीवास्तव म्हणाले. ते एबीपी न्यूजच्या आयडियाज ऑफ इंडिया 2023 (Ideas of India Summit 2023) कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
मारुती सुझुकीने भारतात 40 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने संवाद साधताने कंपनीचे मार्केटिंग हेड शशांक श्रीवास्तव म्हणाले की, "मारुती सुझुकीने गेल्या 40 वर्षांत देशात 25 कोटींहून अधिक कार विकल्या आहेत. कंपनी दररोज 4,000 हून अधिक वाहनांची निर्मिती करते. कंपनीचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. 40 वर्षांपूर्वी भारतात दर हजार लोकांमागे फक्त 2.4 कार होत्या, मात्र आता हा आकडा 30 वर पोहोचला आहे, तर अनेक विकसित देशांमध्ये हा आकडा 700 पेक्षा जास्त आहे. त्यामुळेच भारत सध्या कार क्षेत्रासाठी मोठी बाजारपेठ आहे. भारत 2022 मध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा कार उत्पादक देश आहे. देशभरात आमचे 3500 हून अधिक शोरूम्स आणि 4000 हून जास्त वर्कशॉप्स आहेत. भारतातील 6.5 लाख गावांपैकी 4.5 लाख गावांमध्ये मारुतीने आपली ओळख आणि विश्वास निर्माण केला."
मारुती सुझुकी संपूर्ण व्यवसायाच्या 60% पेक्षा जास्त व्यवसाय करते. जी भारताच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला आहे. जपानच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात कारचा खप वाढणार आहे. सध्या कंपनीने 2030 पर्यंत दरवर्षी 6 मिलियन कार विकण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. सध्या हा आकडा 3.8 मिलियनवर आहे.
परदेशातही मारुतीच्या गाड्यांची क्रेझ
शशांक श्रीवास्तव म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मारुती ही भारतातील सर्वात मोठी कार निर्यातदार आहे आणि या आर्थिक वर्षातही आम्ही 2.5 लाखांहून अधिक वाहनांची निर्यात करत आहोत. 40 वर्षांपूर्वी भारतात वाहनांचे कोणतेही कंपोनेंट्स तयार केले जात नव्हते. पण, आता आम्ही भारतासह जगभरातील अनेक देशांना ऑटो पार्ट्सचा पुरवठा करत आहोत. यावरून मारूतीची प्रगती दिसून येते. यामुळे देशात रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत.
स्वस्त होतील इलेक्ट्रिक वाहनं
इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोलताना ते म्हणाले की, सध्या देशात ईव्हीच्या किमती खूप जास्त आहेत आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांच्या बॅटरी खूप महाग आहेत. मारुती सुझुकी देशातील इलेक्ट्रिक वाहन घटकांच्या निर्मितीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे, ज्यामुळे त्यांच्या किमती आगामी काळात कमी होतील. कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार 2024-25 मध्ये लॉन्च करणार आहे, तर 2025 पर्यंत कंपनी देशात 6 EV लाँच करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :