Ideas of India Summit 2023 : वडील सुपरस्टार असूनही निवडलं संगीतक्षेत्र, लकी अली म्हणतात, 'अभिनय अवघड नाही, पण संगीत खास'
Lucky Ali In ABP Network Ideas of India Summit : एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' परिसंवादामध्ये गायक, अभिनेते लकी अली यांनी हजेरी लावली.
Lucky Ali In ABP Network Ideas of India Summit : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये गायक, अभिनेते लकी अली (Lucky Ali) यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांवर भाष्य केलं.
लकी अली म्हणाले,"आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मी खचल्यानंतर माझे वडील कायम माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. वडील सुपरस्टार असूनही मी संगीतक्षेत्र निवडलं. माझ्या आयुष्यात सिनेमाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. वडील सिनेसृष्टीत असल्याने मी अनेकदा त्यांच्यासोबत सिनेमाच्या सेटवर गेलो आहे. पण अभिनयापेक्षा मला संगीताची गोडी लागली".
लकी अलीने वडिलांकडून घेतलेल्या पैशाचे काय केले?
एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023'मध्ये लकी अली म्हणाले,"माझ्या वडिलांनी मला व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये दिले होते. यातील 50 हजारांतं मी कार्पेट विकत घेतलं तर उरलेले पैसे मी प्रवासावर खर्च केले. पण नंतर मला कार्पेटचा व्यवसायही बंद करावा लागला. मी एक यशस्वी उद्योगपती होऊ शकलो नाही".
अभिनय अवघड नाही : लकी अली
अभिनय क्षेत्राऐवजी संगीतक्षेत्र निवडण्याबद्दल लकी अली म्हणाले,"अभिनय ही काही अवघड गोष्ट नाही. प्रत्येकजण अभिनय करतो पण संगीत खास आहे. संगीतात साधना आहे, सूर आहे, संगीतातली प्रत्येक गोष्ट ही खूपच खास आहे".
'या' कारणाने लकी अली यांनी मुंबई सोडली?
मुंबई हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. मुंबई खरंतर माझी मातृभूमी आहे. पण आता पूर्वीसारखं हे शहर राहिलेलं नाही. त्यामुळेच मी बंगळुरूला जाण्याचा निर्णय घेतला. सध्या बंगळुरूमध्ये मी सेंद्रिय शेती करत आहे.
सिनेमा माझ्यासाठी बनलेला नाही. मला संगीत आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळे मला सिनेसृष्टी आवडत नाही, असं मी म्हणणार नाही. पण हे क्षेत्र माझ्यासाठी नाही हे मला जाणवलं आहे. मुळात 'बॉलिवूड' या नावावर माझा विश्वास नाही. मला 'भारतीय सिनेसृष्टीत' हे नाव माहित आहे. 'बॉलिवूड' या नावात अभिमान वाटण्यासारखं काहीच नाही.
अपयशाचा अर्थ सगळं संपलं असा होत नाही - लकी अली
अपयशाबद्दल भाष्य करताना लकी अली म्हणाले,"अपयशाचा अर्थ सगळं काही संपलं असा होत नाही. त्यामुळे अपयशाला घाबरु नका. मला असं वाटतं, अपयश हे सकारात्मक आहे. आयुष्यात जर तुम्ही अयशस्वी झाला नाहीत तर तुम्ही मोठे होणार नाहीत.
भारताच्या भविष्याबद्दल बोलताना लकी अली म्हणाले,"आपला देश साधा असला तरी जगातील इतर देशांपेक्षा खूपच वेगळा आहे. आवश्यक असलेलं सर्व तंत्रज्ञान देशात उपलब्ध आहे. मनुष्यबळदेखील आहे. पण या दोन्ही गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करण्यात देश कुठेतरी कमी पडतो आहे".
एबीपी नेटवर्क 'आयडियाज ऑफ इंडिया'
एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) हा परिसंवाद 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे.
संबंधित बातम्या