'महाराष्ट्र आता तुमच्यावर हसतोय'; संजय शिरसाट यांची संजय राऊतांवर खोचक टीका
Sanjay Shirsat On Sanjay Raut : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.
Sanjay Shirsat On Sanjay Raut : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय दिल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा आरोप केलाय. त्यांच्या याच आरोपाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना गांभीर्याने घेऊ नका, कारण आता त्यांना महाराष्ट्र हसतोय अशी टीका शिरसाट यांनी केली आहे.
आग्रा येथे होत असलेल्या शिवजयंतीसाठी गेलेल्या आमदार शिरसाट यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. ते म्हणाले, "संजय राऊत यांनी केलेले आरोप खरे असतील असे तुम्हाला वाटते का? महाराष्ट्र हसायला लागला आहे या लोकांवर, कोणते आरोप करायचे कुणावर करायचे... आता म्हणतात निवडणूक आयोगाने 2000 कोटी रुपये घेतले आहेत. मी 50 खोके ऐकत होतो ते बरं वाटत होतं. कारण ती थोडीशी रक्कम होती. आता एवढी मोठी रक्कम निवडणूक आयुक्तांनी कोणत्या घरात ठेवली आहे हे देखील विचारून घेतलं पाहिजे असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
'शॉक देण्याची गरज'
"या लोकांच्या डोक्यावर आता परिणाम झाला आहे. यांना आता वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज असून, त्यांना थेट शॉक देण्याची गरज आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटत आहे की उद्धव ठाकरे यांना सहन करत आहे. बरं उध्दव ठाकरे यांची अवस्था अशी झाली की, धरलं तर चावतंय आणि पळलं तर भुंकतोय. संजय राऊतांसारखे दोनचार लोकं त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या आरोपांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आम्ही तर बिलकुल दखल घेत नाही, पण उद्धव ठाकरेंना दखल घेण्याची गरज असल्याचं शिरसाट म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जातेय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला. तसेच, हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.