महाराष्ट्राच्या राजकारणातील पुत्रप्रेम!
राजकारणात पुत्रप्रेमातून नेहमीच एक इतिहास निर्माण झाला आहे. पुत्रप्रेमासाठी राजकारणात वेगळा मार्ग निवडलेल्या काही राजकारण्यांचे राजकीय नुकसानही झालं. तर पुत्रप्रेमामुळेच नवीन पक्षदेखील उदयाला आले आहेत. आता त्यातच सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या पुत्रप्रेमाच्या राजकारणाची एक नवी कडी जोडली जाणार का? याचीच चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील पुत्रप्रेमामुळे निर्माण झालेल्या तिढ्यांचा इतिहास काय सांगतो?
औरंगाबाद : इतिहास आणि पुराण दोन्ही साक्षी आहेत. सत्ययुगापासून कलियुगापर्यंत मोठ्या घटनांची नांदी हे पुत्रप्रेम ठरली आहे. ती ध्रुव बाळाची कथा असो वा भरताला राज्य मिळावे म्हणून कट करणाऱ्या कैकयीची. अथवा दुर्योधनास त्याचा हक्क मिळावा अशी इच्छा असलेल्या धृतराष्ट्रची सगळ्यांनीच पुत्रप्रेम महत्त्वाचे मानले आणि इतिहास वेगळाच घडला. खरंतर हे सगळं आठवण्याचं कारण महाराष्ट्रात सुरु असलेले पुत्राप्रेमाचं राजकारण. पुत्रप्रेमाचा इतिहासाचा आमदारकी किंवा खासदारकी पुरताच मर्यादित राहिला नाही, तर नगरसेवकापासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत पोहोचलेला आहे. याच पुत्रप्रेमच्या इतिहासामध्ये आता नवी कडी जोडली जाणार का? याची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुत्र प्रेमामुळे निर्माण झालेल्या तिढ्यावर खल सुरु आहे.
पण ही काही पहिली वेळ नाही. महाराष्ट्रातील राजकारणाला जेव्हापासून वारसा पद्धत सुरु झाली तेव्हापासूनच पुत्रप्रेमाच्या इतिहासाची पानं लिहायला सुरुवात झाली. यात पुत्र प्रेमाच्या राजकारणाच्या इतिहासातून मोठे नेते सुटले नाहीत मग ते बाळासाहेब ठाकरे असोत वा शरद पवार केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये घराणेशाहीचा उदय झाला आणि पुत्रप्रेमाच्या राजकारणाच्या इतिहासाचे पान लिहायला सुरुवात झाली. वारसदाराचे राजकीय सेटलमेंट करण्यासाठी अनेकांनी आपल्या ध्येय धोरणातही बदल केला. यातून एकही मोठा नेता सुटला ना पक्ष. दिव्य मराठी'चे संपादक संजय आवटे पुत्रप्रेमाचा इतिहास सांगताना त्याची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून करतात. पुत्रप्रेमाचा आरोप करत तर राज ठाकरे वेगळे निघाले आणि आपल्या स्वतंत्र राजकीय पक्ष उभा केला. तेच पुढे पुत्रप्रेम उद्धव आणि आदित्यमध्ये पाहायला मिळते. खरंतर शिवसेनेमध्ये सतरंज्या उचललेले, पक्षासाठी खस्ता खाल्लेले असंख्य नेते आहेत. पण साधा नगरसेवकपदाचाही अनुभव नसताना आदित्य ठाकरे मंत्री झाले याचा पाया पुत्रप्रेम नाही तर दुसरे काय?
आता गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात पुत्रप्रेमापोटी कसे बदल होत गेले हे पाहूया.
- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या भवितव्यासाठी काँग्रेस सोडून भाजपात गेले.
- विजयसिंह मोहिते यांनी मुलगा रणजित मोहिते यांच्या राजकीय भविष्यासाठी पक्ष सोडला.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखीन एक दिग्गज नेते मधुकर पिचड यांनी आपला मुलगा वैभव साठी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.
- राधाकृष्ण विखे पाटील यांनाही आपल्या मुलाचे भवितव्य काँग्रेसमध्ये दिसलं नाही, त्यामुळे त्यांनी देखील काँग्रेस सोडत भाजपाचे कमळ हातात घेतलं.
लोकमतचे संपादक चक्रधर दळवी म्हणतात, राजकारणात तरी वेगळे काय घडलंय? पंकजा वारस असं गोपीनाथरावांनी ठरवलं आणि घरात महाभारत झालं. अमित देशमुखाच्या प्रेमात विलासरावांनी आपले जुणे सहकारी गमावले. वर्षानुवर्ष राष्ट्रवादीत राहिलेल्या पद्मसिंह पाटलांना देखील मुलगा राणाजगजितसिंह यांच्या राजकीय भवितव्यासाठी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी द्यावी वाटली. भाऊ असेपर्यंत पोराला संधी नाही हे लक्षात आल्यावर बीडच्या रवींद्र क्षीरसागर यांनी जयदत्त यांच्याशी बंड केलेच. विजय गावित, हिना गावित, सतीश चतुर्वेदी अशी कितीतरी उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात देता येतील.
ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी म्हणतात, सुप्रिया यांच्याविषयी शरद पवारांचं प्रेम हे पुत्रप्रेम नाही का? सुप्रिया यांच्यासाठी पवारांनी काही तडजोडी केल्या नाहीत असं नाही. मग आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्याचा विचार केला तर काय बिघडलं आणि हे घडणारच आहे मग ते कुठलंही कुटुंब असू देत. शरद पवारांनी पक्ष बनवताना याच वादाचा फायदा घेतल्याचे असंख्य उदाहरणं आहेत.
बरं हा पुत्रप्रेमाचा इतिहास काही खासदारकी किंवा आमदारकी पुरता मर्यादित राहिलेला नाही. तो नगरसेवकापासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत पोहोचलेला आहे. याचे मुख्य कारण आता हे राजकीय घराणेशाही आणि जोपर्यंत घराणेशाही राजकारणात असेल तोपर्यंत अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्र अनुभवेल.