Ashadhi Wari: 'नाथां'च्या पालखी सोहळा प्रस्थानाला एक दिवस शिल्लक; वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
Ashadhi Wari 2022: पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी साध पाणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही.
Ashadhi Wari 2022: महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमाकांचा पालखी सोहळ्याचे मान असलेल्या पैठणच्या संत एकनाथ महाराज यांची पालखी निघण्यासाठी एक दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला असतानाच वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जिल्हा प्रशासनातर्फे या सोहळ्याचे कुठलंही नियोजन करण्यात न आल्यामुळे वारकरी संतप असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्याचा पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार की नाही याकडे वारकऱ्यांसह नाथ भक्तांचे लक्ष लागले आहे.
राज्यभरातील मानाच्या पालख्या पंढरपुरच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यातच तिसऱ्या मानाची पालखी म्हणजेच पैठण येथील संत एकनाथ महाराज यांची पैठण येथून निघणारी पालखी समजली जाते. त्यासाठी दरवर्षी प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जाते. तसेच वारकरी आणि प्रशासनात बैठका सुद्धा होतात. पालखीसाठी असणाऱ्या अडी-अडचणी समजून घेऊन त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मार्ग काढला जातो. तसेच पालखी दरम्यान वारकऱ्यांना लागणाऱ्या सोयी-सुविधा सुद्धा पुरवल्या जातात.
वारकऱ्यांची नाराजी...
वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवासह सर्व मूलभूत व्यवस्था सोहळा सुरू होण्यापूर्वी करण्याच्या विशेष सूचना दिलेले असताना देखील स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोहळ्याच्या नियोजनाकडे कुठलेही लक्ष दिले नसल्याचा तक्रारी वारकऱ्यांनी केल्या आहेत. पहिल्याच मुक्कामाचे गाव असलेल्या चनकवाडी गावाला जाण्यासाठी वारकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे तात्काळ पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कोणताही पर्यायी रस्ता तयार करून देण्यात आला नाही. तसेच प्राथमिक सोय सुविधा सुद्धा उपलब्ध झाली नसल्याची माहिती पालखी सोहळ्याचे प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांनी दिली आहे.
असा असणार पालखी सोहळा प्रस्थान
उद्या 20 जुन रोजी सायंकाळी सूर्यास्तवेळात शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा पवित्र पादुका पालखी सोहळा पंढरपूर येथील सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रस्तान होणार आहे. या पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 30 ते 35 हजार महिला पुरुष वारकरी दरवर्षीप्रमाणे सहभाग होतात. या पालखी सोहळ्यामध्ये 19 ठिकाणी मुक्काम केल्यानंतर 20 वा मुक्काम थेट पंढरपुरात केला जातो. दरम्यान 9 जुलै रोजी नाथांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.