मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत 'डार्क हॉर्स' ठरलेले सूर्यकांत विश्वासराव आहेत तरी कोण?
Marathwada MLC Election: सूर्यकांत विश्वासराव यांनी घेतलेली आघाडी पाहता आता त्यांच्यात आणि काळे यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.
Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सकाळपासून सुरु झाली असून, पहिल्या पसंतीच्या मतपत्रिकेत कोटा पूर्ण होऊ शकला नसल्याने दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु झाली आहे. दरम्यान आतापर्यंत राष्ट्रवादी आणि भाजप असा सामना समजला जात असतानाच यात नवीन घडामोड घडताना पाहायला मिळत आहे. कारण पहिल्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे विक्रम काळे असताना दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव आहेत. तर भाजप उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकांत विश्वासराव यांनी घेतलेली आघाडी पाहता आता त्यांच्यात आणि काळे यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.
'डार्क हॉर्स' ठरलेले सूर्यकांत विश्वासराव आहेत तरी कोण?
यंदाच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सूर्यकांत विश्वासराव यांना मराठवाडा शिक्षक संघाने उमेदवारी दिली. सूर्यकांत विश्वासराव यांचा जन्म 1 जून 1964 रोजी कंधार तालुक्यातील धर्मापुरी येथे झाला. 1988 पासून त्यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कुरळा येथील शाळेत शिक्षकी नोकरी पत्करली. शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशी 35 वर्षे सेवा बजावल्यानंतर ते निवृत्त झाले. विश्वासराव हे 2003 ते 2008 या काळात मराठवाडा शिक्षक संघाचे कंधार तालुकाध्यक्ष, 2008 ते 2022 या काळात नांदेड जिल्हाध्यक्ष आणि 2022 मध्ये त्यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या विश्वासराव यांनाच संघटनेने बिनविरोध उमेदवारी जाहीर केली. तर सूर्यकांत विश्वासराव गेली पंचावन्न वर्षे मराठवाड्यात कार्यरत आहे.
29 जानेवारी 1967 रोजी मराठवाडा शिक्षक संघाची स्थापना झाली. संघटनेचे जाळे मराठवाडाभर पसरलेल्या मराठवाडा शिक्षक संघाने यावेळच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली आणि ही संघटना ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना पहिल्या पसंतीची 13 हजार 543 मते मिळाली आहेत. यापूर्वी मराठवाडा शिक्षक संघाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळवला होता. प.म. पाटील आणि पी. जी. दस्तूरकर हे मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार होते. परंतु 2004 मध्ये राष्ट्रवादीचे वसंत काळे यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या विजयाची परंपरा खंडित केली आणि तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहिला होता. यंदा मात्र शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षाचा शिरकाव नको, म्हणून मराठवाडा शिक्षक संघाने निवडणुकीच्या रिंगणात सर्व ताकद पणाला लावली आहे.
जुन्या पेन्शन योजनेवरून शिक्षकांचा थेट मतपत्रिकेतून रोष
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासात जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा सर्वाधिक चर्चेचा ठरला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या प्रचार सभेतून जुनी पेन्शन योजनेचा उल्लेख केला होता. दरम्यान याच मुद्यावरून शिक्षकांनी आपला रोष मतपत्रिकेतून व्यक्त केला आहे. औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेल्या मतदानावेळी मतपत्रिकेत 'नो पेन्शन, नो व्होट', जुनी पेन्शन योजना द्या असे मजकूर लिहिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! औरंगाबाद विभागात दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात