Aurangabad: गुरं चारून परतताना तिघांच्या अंगावर पडली वीज; एकाचा जागीच...
Aurangabad : कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारातील धक्कादायक घटना
Lightning Strike: औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नादरपूर शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, शनिवारी सायंकाळी अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तर यात दोघे जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहे. तर या घटनेत नामदेव शेनफडू निकम (वय 35) यांचा मृत्यू झाला असून, प्रकाश तेजराव निकम ( वय 29 ) व दिपक विष्णू निकम (वय 17) जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नादरपूर शिवारातील गट न. 447 मध्ये गुरं चारून परतताना नामदेव शेनफडू निकम यांच्या अंगावर वीज पडली. त्यामुळे त्यांचे जागीच मृत्यू झाला. सोबतच त्यांच्या बाजूला असलेले प्रकाश निकम आणि दिपक निकम यांच्या अंगावर देखील विज कोसळल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर पिशोर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. नामदेव निकम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.
गावात शोकाकुल वातावरण...
गावातील तिघांच्या अंगावर वीज पडल्याने नादरपूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातच तिघांपैकी नामदेव शेनफडू निकम यांचे मृत्यू झाल्याने गावात शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे. नामदेव यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने निकम कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
शेतकऱ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू..
दुसऱ्या एका घटनेत शेतातील शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील सदाशिव सखाराम आधाने (वय 30 वर्षे) हे स्वतः च्या शेतात कपाशी पिकाला औषध फवारणीसाठी सकाळी नऊ वाजता गेले होते. औषध फवारणीसाठी शेततळ्यातून पाणी काढताना त्यांचा तोल गेला. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मदतीसाठी त्यांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यावेळी आजूबाजूला कोणीही नव्हते.
सायंकाळपर्यंत सदाशिव हे घरी आले नसल्याने रात्री कुटुंबातील सदस्यांनी शेतात शोध घेतला. यावेळी शेततळ्याजवळ औषध फवारणीचे साहित्य दिसले. त्यामुळे गावातील नागरिकांनी शेततळ्यात उड्या मारून शोध घेतला असता, सदाशिव यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे या घटनेची माहिती खुलताबाद पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
महत्वाच्या बातम्या...