(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bank Loan Camp: औरंगाबादेत कर्ज वाटप मेळाव्याने उघडले राजकीय वादाचे अकाउंट
Aurangabad: राज्यस्तरीय भव्य कर्ज मेळावा फक्त भारतीय जनता पक्षातील लोकांच्या फायद्यासाठी आणि निवडणुकीचा अजेंडा म्हणून भरवला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Bank Loan Camp: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत सोमवारी औरंगाबादमध्ये भव्य असा कर्ज मिळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध बँकांकडून तब्बल 2900 कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं, मात्र आता हा मेळावा राजकीय वादात सापडलाय. औरंगाबादमध्ये झालेला राज्यस्तरीय भव्य कर्ज मेळावा फक्त भारतीय जनता पक्षातील लोकांच्या फायद्यासाठी आणि निवडणुकीचा अजेंडा म्हणून भरवला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या पुढाकाराने 18 बँकांतर्फे औरंगाबादमध्ये राज्यस्तरीय भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रात सुमारे 2 हजार 952 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 23 हजार जणांना 925 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. मात्र हा कर्ज मेळावा आता राजकीय वादात सापडला आहे. कारण हा कर्ज मेळावा निवडणुकीचा अजेंडा असून, भाजपच्या चेल्याचपाट्यांनाच याचा फायदा होणार असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तर बँक कर्मचारी संघटनांनी सुद्धा यावर आक्षेप घेतला आहे.
कराड आपल्या घरातून कर्ज दिल्यासारखे दाखवतायत: जलील
यावर प्रतिक्रिया देतांना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, भागवत कराडांना आपल्या कार्यकर्त्यांना कर्ज द्यायचे आहे. त्यासाठीचं भव्य कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे कर्ज वाटप जसे कराड आपल्या घरातून करत आहे अशी जाहिरात त्यांनी वर्तमानपत्रातून दिली. शिक्षण कर्ज सहा टक्के झाले, सर्वसामान्य गरिबाला अवघ्या दहा हजार रुपयांचा कर्ज मिळत नाही. मात्र दुसरीकडे कार्यकर्त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. अशाप्रकारे दिलेल्या कर्जांची वसुली होत नाही, असेही जलील म्हणाले.
बँक कर्मचारी संघटनांचा विरोध...
याबाबत बँक कर्मचारी संघटनांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी सुद्धा काँग्रेस राजवटीत अशाच प्रकारे कर्जवाटप सोहळे घेण्यात आले होते. आता पुन्हा भाजप राजवटीत त्याच पद्धतीने असे सोहळे भरवले जात आहे. अशा कर्ज मेळाव्यात वाटलेली कर्ज गुणवत्तेच्या निकषावर न वाटता बॅक अधीकारी यांच्या वर आपल्या राजकीय पदाचा प्रभाव टाकून मंजूर करून घेवून राजकीय हेतूने वाटली जातात. त्यामुळे बहुतांश वेळा ही कर्ज वसूल होत नाहीत असा बँकांचा यापूर्वीचा अनुभव आहे. विशेष म्हणजे, ही कर्जे थकीत झाली की, कुठलाच राजकीय पक्ष कधीच वसुलीसाठी पुढे येत नाही. तर निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षाकडून ही थकीत कर्ज माफ केली जावीत अशी भूमिका घेतली जाते.
एकही भाजप कार्यकर्ता दाखवून द्या: कराड
कर्ज वाटप सोहळ्या प्रकरणी झालेले सर्व आरोप खोटे असल्याचं भागवत कराड म्हणाले आहे. या कर्जवाटप सोहळ्यात एकही भाजप कार्यकर्ता दाखवून द्या असा दावाही कराड यांनी केला आहे. जर शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असू, तर कुणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण असा खोचक टोलाही कराड यांनी विरोधकांना लावला आहे.