शिंदे गटाला औरंगाबादमध्ये दुसरा मोठा धक्का, बिडकीननंतर महालगावातही पराभव
Gram Panchayat Result 2022 Live: शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
Mahalgaon Gram Panchayat Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहे. ज्यात शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. पैठण तालुक्यातील शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची बनलेली बिडकीन ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या ताब्यात गेली असतानाच, वैजापूर तालुक्यातील महालगावची ग्रामपंचायत देखील ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
महालगावात शिंदे गटाकडून मीना रजनीकांत नजन रिंगणात होत्या, तर ठाकरे गटाकडून रोहिणी नानासाहेब काळे मैदानात होत्या. अंतिम मतमोजणीवेळी रोहिणी काळे यांना 1354 मते पडली असून, मीना नजन यांना 1251 मते पडली आहे. त्यामुळे शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायत निकालाकडे संपर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
यामुळे झाली ग्रामपंचायतची चर्चा
आमदार बोरनारे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर वैजापूर मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांनी मात्र ठाकरे गटात राहणं पसंद केले होते. त्यामुळे अनेकदा बोरनारे यांना ठाकरे गटाकडून विरोध देखील झाला होता. तर ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी महालगावात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या आमदार बोरनारे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांच्यात वाद झाला होता. या वादाचे व्हिडिओ देखील समोर आले होते. त्यामुळे या घटनेची राज्यभरात चर्चा देखील झाली होती. मात्र त्याच महालगावात आता ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे.
वैजापूर तालुक्यात 85.59 टक्के मतदान
वैजापूर तालुक्यातील24 ग्रामपंचायतीसाठी 74 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी 15760 स्त्री आणि 13460 पुरुष असे एकूण 29220 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे वैजापूर तालुक्यात एकूण 85.59 टक्के मतदान झाले आहे.
शिंदे गटाला औरंगाबादमध्ये मोठा धक्का, बिडकीनची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे