शिंदे गटाला औरंगाबादमध्ये मोठा धक्का, बिडकीनची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे
Gram Panchayat Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना मोठा धक्का समजला जात आहे.
Bidkin Gram Panchayat Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिडकीन ग्रामपंचायतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यांची सत्ता आली आहे. बिडकीन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ठाकरे गटाचे उमेदवार अशोक धर्मे यांचा विजय झाला आहे. अशोक धर्मे 1200 मतांनी विजयी झाले असून, शिंदे गटाचे उमेदवार बबन ठाणगे यांचा पराभव झाला आहे. ठाकरे गटासाठी हा विजय महत्वाचा समजला जात आहे. तर भुमरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल हाती येत आहेत. दरम्यान पैठण तालुक्यातील बिडकीन ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वच जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण याच गावात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रॅली काढल्या होत्या. तर औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा देखील याठिकाणी पणाला लागली होती. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी चुरीशीची लढत पाहायला मिळाली होती. मात्र अखेर या ग्रामपंचायतवर ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे.
आडूळ ग्रामपंचायतही ठाकरे गटाच्या ताब्यात...
संदिपान भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत आडूळ देखील ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटात जाणाऱ्या भुमरे यांना बिडकीन आणि आडूळ या दोन्ही ठिकाणी आव्हान देण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी बहुतांश शिवसैनिकांनी ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आज आलेल्या निकालानंतर बिडकीन ग्रामपंचायत आणि आडूळ ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी भुमरे यांच्या समर्थकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मतदारसंघात भुमरेंच वर्चस्व कायम...
बिडकीन आडूळ ग्रामपंचायत पराभव झाला असला,तरीही भुमरे यांनी पैठण मतदारसंघात आपलं वर्चस्व मात्र कायम ठवले आहे. कारण पैठण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीपैकी 16 ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्या असल्याचा दावा भुमरे समर्थकांनी केला आहे. ज्यात हीरापुर, जांभळी, गेवराई बार्शी, तारु पिंपळवाडी, मुधलवाडी, नारायणगांव, टाकळी पैठण, चिंचाळा, धनगांव, सालवडगांव, कृष्णापुर, देवगांव, नांदर, दिन्नापुर, वरवंडी, कुरणपिंप्रि यांचा समावेश आहे. तर इतर 2 ठाकरे आणि 4 राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत.
पैठण तालुक्यात 86.64 टक्के मतदान
पैठण तालुक्यातील एकूण 22 ग्रामपंचायतीसाठी 94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. यावेळी 20519 स्त्री आणि 23589 पुरुष असे एकूण 44108 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे पैठण तालुक्यात एकूण 86.64 टक्के मतदान झाले आहे.