(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भोंग्याविरुद्ध राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या औरंगाबादच्या चौकाचौकात प्रशासनानेच लावले भोंगे, पण....
Aurangabad Loudspeaker: स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील 400 चौकांवर 450 लाउडस्पीकर लावण्यात आले आहेत.
Aurangabad Loudspeaker: काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून (Masjid Loudspeaker) आक्रमक भूमिका घेतली होती. या काळात त्यांनी औरंगाबादमध्ये सभा घेऊन तत्काळ भोंगे काढून घेण्याचा इशारा दिला होता. मात्र आता त्याच औरंगाबाद शहराच्या (Aurangabad City) चौकाचौकात प्रशासनाकडून भोंगे लावण्यात आले आहे. पण याचे कारण वेगळे असणार असून, भोंगे देखील स्मार्ट असणार आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवणे, वाहतुकीला शिस्त लावणे, अपघातांवर नियंत्रण ठेवणे, यासाठी शहराच्या चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता याच ठिकाणी तब्बल 450 लाउडस्पीकर लावण्यात आले आहेत. घडलेल्या घटनेची क्षणार्धात माहिती घेऊन, वाहनधारकांना व नागरिकांना सूचना करण्यासाठी हे लाउडस्पीकर लावण्यात आले आहे.
शहरातील 400 चौकांवर 450 लाउडस्पीकर
स्मार्ट सिटीमार्फत शहर सुरक्षित ठेवण्यासाठी एमएसआय प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी यापूर्वीच साडेआठशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहरातील चौकात लावण्यात आलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर पोलिस आयुक्त कार्यालय आणि स्मार्ट सिटी कार्यालयातील कमांड कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवले जातात. त्यातच आता स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील 400 चौकांवर 450 लाउडस्पीकर लावण्यात आले आहेत. तर स्मार्ट सिटीच्या आयस्कोप प्रकल्पांतर्गत हे स्पीकर्स लावण्यात आले आहेत.
असा होणार फायदा!
शहरातील चौकाचौकात लावण्यात आलेल्या लाउडस्पीकरमुळे शहर प्रशासन व शहर पोलिस विभागाला शहरात कायदा व सुव्यवस्था, ट्रैफिक शिस्त, पार्किंग अनुशासन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि स्वच्छता ठेवण्यासाठी मदत मिळत आहे. या लाउडस्पीकरमुळे स्मार्ट सिटी, महापालिका व पोलिस प्रशासनास नागरिकांना संदेश देता येईल. महत्त्वाचा संदेश बाजारपेठेत असलेल्या नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचवता येईल. शासकीय संदेश, हवामान अंदाज, हवा प्रदू- षणाबद्दल महत्त्वाच्या सूचना, आपत्कालीन सूचना देण्यासाठी या स्पीकर्सचा वापर करता येणार आहे.
तत्काळ सूचना देता येणार...
औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी आणि पोलीस शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवतात. अनेकदा चौकात ट्राफिक जाम होते, लोकं बेशिस्त वाहन चालवतात. त्यामुळे आता या लोकांना लाउडस्पीकरच्या माध्यमातून सूचना देता येणार आहे. तसेच काही महत्वाच्या घोषणा देखील या माध्यमातून करता येणार आहे.