Aurangabad: औरंगाबादच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय मानपान नाट्य; अंबादास दानवेंकडून शिवीगाळ
Aurangabad : पहिल्यांदाच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या अनुपस्थित संस्थांन गणपतीची सार्वजनिक आरती करण्यात आली.
![Aurangabad: औरंगाबादच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय मानपान नाट्य; अंबादास दानवेंकडून शिवीगाळ maharashtra News Aurangabad News Political drama in Aurangabad Ganesh Visarjan Aurangabad: औरंगाबादच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय मानपान नाट्य; अंबादास दानवेंकडून शिवीगाळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/09/3262c8b7839669da6871e1e9eaa5b6cd166270895119589_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News: राज्यात नव्याने आलेलं शिंदे-भाजप सरकार आणि शिवसेनेतील वाद काही थांबता थांबत नाहीये. त्यातच हाच वाद आता गणेशोत्सवात सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबादमध्ये सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असं मानापमान नाट्य पाहायला मिळालं. मागील 28 वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या अनुपस्थित संस्थांन गणपतीची सार्वजनिक आरती करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास यांना राग अनावर झाला.
दरवर्षी सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन आरती करतात. त्यानंतर हे सर्व नेते एकत्र येऊन संस्थान गणपतीचा रथ उडतात आणि सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होती. मात्र यावेळी आरतीला भाजपाचे नेते तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे आणि इतर भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते. काही वेळानंतर अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे आले आणि मग मानापमान नाट्याला सुरुवात झाली.
आरतीच्यावेळी भाजप नेत्यांनी खैरे यांची वाट न पाहता आरती केल्याने शिवसेनेच्या नेत्यांचा पारा चढला. त्यातच स्टेजवर सुद्धा सर्वच भाजप नेते असल्याने दानवे आणि खैरे यांनी तेथून काढता पाय घेतला. तसेच त्यांनी सुद्धा भाजपाच्या नेत्याची वाट न पाहता संस्थान गणपतीचा रथ ओढायला सुरुवात केली. त्यामुळे सेना-भाजपा मानापमान नाट्य पहायला मिळालं.
दानवेंकडून शिवीगाळ...
सर्वच पक्षांचे नेते उपस्थित असतांना आरती करण्याची प्रत्येक वर्षांची परंपरा आहे. मात्र भाजप नेत्यांनी खैरे आणि दानवे यांच्या अनुपस्थितचा आरती सुरु केल्याने अंबादास दानवे चांगलेच संतापले. दानवे एवढे संतापले होते की, त्यांनी आयोजकांना शिवीगाळ केली असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे औरंगाबादच्या गणपती विसर्जनाची सुरवात राजकीय मानापमान नाट्याने झाल्याची पाहायला मिळाले.
खैरे-शिरसाट समोरासमोर...
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेना-भाजपमध्ये मानपान नाट्य सुरु असतानाच, काही काळानंतर शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट त्या ठिकाणी पोहोचले. दरम्यान काही वेळेसाठी चंद्रकांत खैरे आणि शिरसाट समोरासमोर आले. मात्र दोघांनीही एकमेकांना न पाहता पुढे जाणं पसंद केले. त्यामुळे याबाबत विसर्जनाच्या ठिकाणी चर्चा पाहायला मिळाली.
महत्वाच्या बातम्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)