Aurangabad: ध्वजारोहण न करणाऱ्या शासकीय कार्यालयांना प्रशासनाकडून नोटीस, पंचनामाही केला
Aurangabad News:औरंगाबादच्या काही शासकीय कार्यालय आणि बँकेवर ध्वज लावण्यात आले नसल्याचे समोर आले आहेत.
Independence Day 2022: देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असून, देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेत लाखो लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला आहे. मात्र असे असतांना औरंगाबादच्या काही शासकीय कार्यालय आणि बँकेवर ध्वज लावण्यात आले नसल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे या कार्यालयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील दोन शासकीय कार्यालयावर 13 व 14 ऑगस्ट रोजी ध्वज लावण्यात आला नव्हता. तर खुलताबाद तालुक्यातील एक बँकेत सुद्धा ध्वजारोहण करण्यात न आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पैठण येथील त्या दोन्ही कार्यालयांना महसूल विभागाने नोटीसा पाठवल्या असून, खुलताबाद येथील बँकेचे तहसील प्रशासनाने पंचनामा करत अहवाल संबधित प्रशासनाला पाठवला आहे.
या कार्यालयांना पाठवल्या नोटीसा...
स्वातंत्र्याचा अमृत महात्सव साजरा करताना शासकीय कार्यालयांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. तर अनेक शासकीय कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही घरोघरी तिरंगा फडकावला आहे. असे असतांना दुसरीकडे पैठण शहरातील भारतीय संचार निगम लिमिटेड व वखार महामंडळाच्या विहामांडवा येथील कार्यालयात 13 व 14 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणच करण्यात आले नाही. त्यामुळे याची दखल घेत तहसीलदार दत्ता निलावाड यांनी या दोन्ही कार्यालय प्रमुखांना नोटीस बजावली असून, खुलासा करण्याचे आदेश दिले आहे. सोबतच खुलासा न केल्यास काही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार असल्याचा इशाराही दिला आहे.
त्या बँकेचा पंचनामा...
पैठण येथील शासकीय कार्यालयाप्रमाणे खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथील सेंट्रेल बँक ऑफ इंडियाच्या शाखेने 13 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण न केल्याने गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा केली होती. त्यामुळे अखेर तहसीलदार यांच्या सुचनेनुसार स्थानिक तलाठी यांनी बँकेचा पंचनामा केला आहे. तसेच तो संबधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या...
CM Eknath Shinde FLag Hoisting: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण