(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad News : उमेदवार कोणीही असो खासदार मीच; एमआयएम-शिंदे गटात रंगला कलगीतुरा
Aurangabad Political News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. औरंगाबादचे खासदार कोण होणार यावरुन इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
Aurangabad Political News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Upcoming Lok Sabha Elections) अनुषंगाने औरंगाबादमध्ये (Aurangabad) आतापासूनच आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यावरुन एमआयएमचे खासदार (MIM MP) आणि शिंदे गटात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. तर शिंदे गटाचे मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'उमेदवार कोणीही असो खासदार मीच असणार,' असा खोचक टोला जलील यांनी भुमरेंना लगावला आहे.
लोकसभेच्या अगामी निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार होईल, असा दावा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. त्यास प्रत्युत्तर देत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीतही दोघांच्या भांडणाचा फायदा आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे रिंगणात कितीही आणि कोणीही उमेदवार येऊ द्या, पुढचा खासदार हा मीच असेन, असा प्रतिदावाच त्यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध एमआयएम असा वाद पाहायला मिळत आहे.
'मी शिवसेनेत प्रवेश करेन असे वाटलं असेल...'
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (16 जानेवारी) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त पालकमंत्री भुमरे शहरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "जिल्ह्याचा आगामी खासदार हा शिवसेनेचाच होणार आहे. तशी तयारीदेखील सुरु आहे." त्यांच्या या वक्तव्यावर खासदार जलील यांनी प्रतिक्रिया दिली. "कदाचित मी शिवसेनेत प्रवेश करेन असे भुमरे यांना वाटले असावे. त्यामुळेच त्यांनी हा दावा केला असावा," असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, "येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कितीही उमेदवार रिंगणात येऊ द्या, कोणालाही उभे राहू द्या, मात्र निवडून मीच येणार हे निश्चित आहे."
भाजपची खैरेंना ऑफर...
दरम्यान एकीकडे लोकसभेवरुन एमआयएम आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरु असतनाच, दुसरीकडे भाजपकडून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शहरात आयोजित करण्यात आलेल्या पतंगबाजीच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी ही ऑफर खैरे यांना दिली आहे. तुम्ही भाजपमध्ये येणार असाल तर मी थांबतो असा शब्द देखील कराड यांनी खैरे यांना दिला आहे. मात्र कराड यांचा प्रस्ताव खैरे यांनी नाकारला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले असल्याचं पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
'आप' स्वबळावर महानगरपालिका निवडणुका लढणार; केजरीवालांचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरवर लक्ष