Aurangabad Measles Updates: औरंगाबादेत गोवरची साथ झपाट्याने पसरू लागली, जिल्ह्यात आणखी 13 संशयितांची भर
Measles Updates: औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporation) हद्दीसह ग्रामीण भागात गोवरची साथ झपाट्याने पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
Aurangabad Measles Updates: औरंगाबाद जिल्ह्यात गोवर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत शहरात आढळणारी संशयित रुग्ण आता ग्रामीण भागात ही आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. शनिवारी शहरात आणखी 11 संशयित रुग्ण आढळून आली असून, वैजापूर तालुक्यात देखील 2 संशयित रुग्ण आढळून आली आहे. औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporation) हद्दीसह ग्रामीण भागात गोवरची साथ झपाट्याने पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
शनिवारी औरंगाबाद शहरात गोवरची आणखी 11 संशयित बालके आढळून आली आहेत. ही बालके रहेमानिया कॉलनी, कोहिनूर कॉलनी, दलालवाडी, अलमगीर कॉलनी, देशमुखनगर, नवाबपुरा, पदमपुरा, मोचीगल्ली, सिडको एन-7, विश्रांतीनगरात संशयित बालके निघाली आहेत. या बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते मुंबई येथील हाफकिन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
ग्रामीण भागात दोन संशयित रुग्ण...
शहरात गोवरने थैमान घातलेले असतानाच आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. वैजापूर तालुक्यात शनिवारी दोन गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले असून रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. शिऊर येथील एका नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासह चिकटगाव येथील दोन वर्षीय बालकाला ताप व अंगावर पुरळ आल्याने या दोघा संशियतांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तीन ते चार दिवसांत अहवाल प्राप्त होणार असून, हे दोघेही गोवरबाधित आहे किंवा नाही याबाबतचा खुलासा त्यानंतरच होणार आहे.सद्या प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
शहरात संशयित रुग्णांचा आकडा वाढला...
औरंगाबाद मनपा हद्दीत आतापर्यंत गोवरचे 88 संशयित बालके आढळून आली आहेत. शनिवारी 11 बालके संशयित निघाल्याने संशयित बालकांची एकूण संख्या 99 इतकी झाली आहे. त्यांपैकी 61 बालकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातून आतापर्यंत 44 बालकांचा अहवाल प्राप्त झाला. 17 बालके पॉझिटिव्ह निघाली तर 15 बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि 12 बालकांचा अहवाल प्रलंबित आहे.
लसीकरणावर भर...
आरोग्य विभागाने 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे अतिरिक्त लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनपा हद्दीत शनिवारी विजयनगर, नेहरूनगर, चिकलठाणा भागात सहा शिबिरे घेऊन 123 बालकांचे लसीकरण करण्यात आले. ज्यात विजयनगरमध्ये 42, नेहरूनगरात 38 आणि चिकलठाणामधील 47 बालकांचा समावेश आहे. त्यासोबतच नियमितपणे एमआर-1 चे 15 आणि एमआर-2 चे 28 बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )