GSTचा महाघोटाळा! औरंगाबाद जीएसटी विभागाच्या कारवाईत बनावट बिलांचा प्रकार समोर, एक हजार कोटींची बनावट बिलं
Aurangabad GST Scam: जीएसटी विभागाने केलेल्या एका कारवाईत बनावट बिलांचा महाघोटाळा समोर आला आहे.
Aurangabad GST Scam: जीएसटी विभागाने केलेल्या एका कारवाईत बनावट बिलांचा महाघोटाळा समोर आला आहे. राज्य कर जीएसटीच्या औरंगाबाद कार्यालयाने केलेल्या तपासणीत 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 500 कोटींची बनावट बिलं समोर आली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल एक हजार कोटींच्या घरात असल्याचा अंदाज जीएसटी कार्यालयातर्फे व्यक्त केला जातोय. त्याच दृष्टीने राज्यकर जीएसटी विभाग तपास करीत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच जीएसटी विभागाने घोटाळा बाहेर काढल्याने खळबळ उडाली आहे. बनावट बिले लावून जीएसटीला चुना लावणाऱ्या दोघांना जीएसटी विभागाने ताब्यात घेतलं होतं त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. फैजल अब्दुल गफ्फार आणि मोहम्मद अजीज मोहम्मद फकीर या दोन आरोपींचा यात समावेश आहे.
बोगस कंपन्या स्थापन करून इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेत 1 हजार कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश औरंगाबादच्या स्टेट जीएसटी केला होता. या प्रकरणाची व्याप्ती आता हजार कोटीच्या पुढे आणि गुजरातसह देशातल्या विविध राज्यांत असल्यानं तपास सुरू केला आहे. औरंगाबाद जीएसटी विभागाच्या कोठडीत असलेले आरोपी फैजल अब्दूल गफार मेवावला आणि मोहोमद अजिज यांनी 35 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून सध्या जवळपास 500 कोटींची बनावट बिले केली होती. आता या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1 हजार कोटींच्या घरात असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. यात मुंबईत डोंगरी येथून औरंगाबाद स्टेट जीएसटी विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
फरहत इन्टरप्राईडेस या नावानं बनावट बिलाचा प्रकार सुरु होता. आरोपी फैजल आणि अजिज हे सगळं करत होते, त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी 30 आधार कार्ड, पॅन कार्ड, 30 च्यावर सीम कार्डस असं आढळून आलं. इतकच नाही तर त्याच्या लँपटॉपवरून मिळालेल्या प्राथमिक माहितीत त्यांनी 500 कोटींवर बील राज्यात वितरीत केली आहेत. यात अनेक बड्या कंपन्यांचा सहभाग असल्याचंही दिसून आलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांच्या माध्यमातून आणखी तपास करण्यात येत आहे. या महाघोटाळ्याची व्याप्ती गुजरात यासह विविध राज्यांत असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. जीएसटीबाबत राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याने त्याचा तपासही त्याच पद्धतीने औरंगाबाद जीएसटीचा विभाग करीत आहे. या घोटाळ्यातून जवळपास 200 कोटी रुपयांची सरकारची फसवणूक झाली असल्याचं या कारवाईतून उघड झालंय.