Aurangabad: औरंगाबादच्या वजनापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, शेताला तळ्याचे स्वरूप
Aurangabad: रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वजनापूर येथील शेतांना तळ्याचे स्वरुप आले असून, पीक पूर्णपणे खराब झाली आहे.
Aurangabad Rain News: मराठवाड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वजनापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस (Heavy Rain) झाला आहे. त्यामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वजनापूर येथील शेतांना तळ्याचे स्वरुप आले असून, पीक पूर्णपणे खराब झाली आहे. त्यामुळे आता सरकारने नुकसानभरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
रात्री वजनापूर गावात आणि परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे गावातील बहुतांश शेतात पाणी तुंबले आहे. आज सकाळी सुद्धा शेतातील पाण्याचा निचरा होऊ शकला नसल्याने परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने काढून ठेवलेली पीक वाहून गेली आहे. तर उभी पीक पाण्यात असल्याने सडली आहे. डोक्यावर अजूनही काळभोर आभाळ पावसाचा इशारा देत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
पैसे कसे फेडायचे...
यावेळी गावातील शेतकऱ्यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हटले की, आम्ही बायकांचे मंगळसूत्र गहाण ठेवून बी-बियाणे खरेदी केली. काहींनी व्याजाने पैसे काढले. शेतातून पिकलेल्या पिकातून उधारीचे पैसे फेडून दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र आधी अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने सर्वचकाही हिसकावून घेतलं आहे. आज शेतात जाण्यासाठी हिम्मत होत नाही. दिवाळी तोंडावर असतांना पीक पाण्याखाली गेली असल्याचं शेतकरी म्हणाले.
पिकांना कोंब फुटले..
तर मोठ्या कष्टाने पीकं पेरली होती. मात्र आता तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून नेला आहे. शेतात तुंबलेल्या पाण्यामुळे पिकांना कोंब फुटली आहे. कापूस,सोयाबीन आणि बाजरी पूर्णपणे मातीमोल झाले आहे. घरात धान्य नाही, लेकीबाळी घरी आली असून त्यांना गोडधोड कसं करावा असा प्रश्न पडला आहे. कधी आयुष्यात असा पाऊस पडला नाही. त्यामुळे आता सरकारने अंत न पाहता शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
दिवाळीचे बाजार ओस पडली...
दिवाळी सारखा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदाची दिवाळी साजरी करणं शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न बनला आहे. कापसासारख्या नगदी पिकातून मिळणाऱ्या पैशातून शेतकरी आपली दिवाळी गोड करतो. पण यावेळी कापूस अक्षरशः पाण्याखाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दिवाळीची बाजार ओस पडले आहे. तर आठवडी बाजारात देखील यावर्षी नेहमीप्रमाणे गर्दी पाहायला मिळत नसल्याचे चित्र आहे.