Ajit Pawar: राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस यंत्रणा झोपली आहे का? अजित पवार संतापले
Ajit Pawar: राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? अशी टीका करत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.
Ajit Pawar On Shinde-Fadnavis Government: रत्नागिरीतील (Ratnagiri) पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. तसेच या प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता याच मुद्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे का? अशी टीका करत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.
औरंगाबादच्या पैठण दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडत असून, सतत घडत आहे. हे सरकार आल्यापासून अशाप्रकारे घटना घडत आहे. मात्र अशाप्रकारे भ्याड हल्ले कोणीही सहन करणार नाही. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला, त्यानंतर प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता तशाच पद्धतीने कोकणमधील एका पत्रकारवर हल्ला करून, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे यामागचा मास्टर माईंड कोण आहे हे देखील समोर आले पाहिजे.अशा घटना घडत असताना सरकार काय करत आहे, पोलीस काय करत आहेत, हे सर्वजण झोप काढतायत का? असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.
तर पुढे बोलताना ते पवार म्हणाले की, राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होत असती तर सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे पाहावे. कायदा सुव्यवस्था कशी कायम राहणार. त्यामुळे या घटनेचा तपास झालाच पाहिजे यासाठी 27 तारखेपासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.
कोणतीही अडचण येईल असं वक्तव्य करणार नाही
संजय राऊत यांच्याकडे काय माहिती आहे हे मला माहित नाही. पण कुणाला कोणी धमकावत असेल आणि सातत्याने अशा घटना घडतायत तर हे सरकारचे अपयश आहे. महाविकास आघाडीतले नेते काही बोलले तर आम्ही बैठकीत बसून त्यावर बोलू, मात्र महाविकास आघाडीला कोणती अडचण येईल असं वक्तव्य मी करणार नाही. आमचे काय म्हणणे आहे ते एकत्र बसतो, त्यावेळी आमची भूमिका मांडू, असेही अजित पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवडच्या बंडखोरीमागील सूत्रधार दुसराच दिसतोय
ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोट निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत केलेल्या बंडखोरीवर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची बंडखोरी करण्यामागचा सूत्रधार कोणी दुसराच दिसतोय, मतांचे विभाजन करण्यासाठी हे केल्याचं दिसतंय. मात्र आदित्य ठाकरे हे सोमवारी जाणार आहेत. सचिन अहिर बंडखोरी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार होते. स्वतः उद्धव ठाकरे हे त्यांच्या मतदारांना आवाहन करतील, असे अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Ajit Pawar: विरोधी पक्षनेते अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर; शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी