(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरत्या वर्षाला निरोप देतांना औरंगाबद आत्महत्यांच्या घटनांनी हादरलं; एकाच दिवशी तिघांनी जीवन संपवलं
Aurangabad Suicide Incident: एकाच दिवसांत तिघांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे
Aurangabad Suicide Incident: अवघ्या काही तासात जग नवीन वर्षात पदार्पण करणार असून, या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र एकीकडे सरत्या वर्षाला निरोप दिला जात असतानाच, दुसरीकडे औरंगाबाद (Aurangabad) मात्र आत्महत्यांच्या (Suicide) घटनांनी हादरलं आहे. कारण एकाच दिवसांत तिघांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. या तिन्ही घटनांची वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना : आजाराला कंटाळुन एका अभियंत्याने घेतला गळफास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजकुमार मधुकरराव कदम ( वय 45 वर्षे) हे अभियंता असून सध्या ते कुठेही कामाला नव्हते. त्यांना काही दिवसांपासून मायग्रेनचा आजार जडला होता. उपचार घेउनही आजार बरा होत नसल्याने ते त्रस्त होते. त्यातुन त्यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार कुटूंबियांच्या चार वाजता लक्षात आला. त्यामुळे त्यांना बेशुध्द अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसरी घटना: तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
अज्ञात कारणावरून एका तरूणाने गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी शिवशंकरकॉलनी येथे उघडकिस आली आहे. गोंविदा अप्पासाहेब खैरे ( वय 24 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. गोंविदा खैरे हा तरूण बीडबाय पासवर असलेल्या एका व्यसन मुक्ती केंद्रात देखभालीचे काम करीत होता. शुक्रवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास गोंविदाने घरातील सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेतला. पण याचवेळी त्याने आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी पोलिसांना माहिती देउन गोंविदाला बेशुध्द अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मात्र गोंविदाने आत्महत्या का केली हे कळू शकते नाही. तर याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तिसरी घटना: दारूच्या नशेत तरूणाची आत्महत्या
दारूच्या नशेत विषारी द्रव्याचे प्राशन करून तरूण मजूराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उस्मानपुऱ्यातील चौसरनगर येथे घडली. संजय अण्णा यादव (वय 35 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यादव हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिवार्ह करीत होता. मात्र गेल्या दिवसांपासून त्याला दारूचे व्यसन जडले होते. संजय इतका दारूच्या आहारी गेला होता की, तो पहाटे पासूनच दारू पित होता. शुक्रवारी पहाटे तो चार वाजेपासून दारू पित होता, त्यातून त्याने शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजता त्याने नशेत विषारी द्रव्य प्राशन केले. हा प्रकार कुटूंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी संजयला घाटी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना आज पहाटे साडे तीन वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.