धक्कादायक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील घटना
Aurangabad News: शेजारील एका शेतकऱ्याने विनाखांब नेलेली विजेची तार उंची कमी असल्याने साहेबराव चेळेकर यांच्या बैलाच्या शिंगात अडकली आणि त्यांचा मृत्यू झाला.
Aurangabad News: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील बायगाव शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, दोन सख्ख्या भावांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बायगाव परिसरात सुसाट सुटलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे विजेचे तार बैलगाडीवर पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. साहेबराव गणपत चेळेकर (वय 70), लहान बंधू बाबुराव गणपत चेळेकर (वय 57) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेळेकर बंधू एकत्र कुटुंबात राहतात. दरम्यान पाऊस बंद झाल्याने शेतातील कामासाठी दोन्ही भाऊ शेतात गेले होते. त्यांनतर संध्याकाळी शेतातील काम आटोपून साहेबराव चेळेकर लोखंडी बैलगाडी हाकत घराकडे निघाले. याचवेळी शेजारील एका शेतकऱ्याने विनाखांब नेलेली विजेची तार उंची कमी असल्याने साहेबराव यांच्या बैलाच्या शिंगात अडकली. यामुळे वीजप्रवाह बैलगाडीत उतरला आणि बैलासह साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला.
भावाला वाचवण्यासाठी गेले आणि...
साहेबराव यांच्या बैलगाडीत वीजप्रवाह उतरल्याने घटनास्थळी मोठा आवाज झाला. त्यामुळे बाबुराव चेळेकर यांनी धाव घेत आपल्या मोठ्या भावाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र याचवेळी त्यांना सुद्धा विजेचा शॉक लागल्याने त्यांचा सुद्धा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी वीजप्रवाह बंद करून दोन्ही भावांना उपचारासाठी देवगाव रंगारी येथील रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
परीसरात हळहळ...
एकत्र कुटुंबात राहणाऱ्या दोन्ही चेळेकर बंधूंची गावात एक वेगळी ओळख होती. वयाच्या शेवटीसुद्धा साहेबराव यांनी आपल्या छोट्या बंधूला सोबत ठेवत कुटुंबातील गाडा एकत्रपणे चालवला. त्यामुळे या दोन्ही भावाची गावात आणि परिसरात चर्चा असायची. दरम्यान एकाचवेळी ऐकाच घरातील दोन महत्वाच्या व्यक्तींवर काळाने झडप घातल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर घटनास्थळी शिऊर पोलिसांनी पाहणी करत तपास सुरु केला आहे.