(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: कंपनीतील सुपरवायझर सतत लगट करण्याचा प्रयत्न करायचा, त्रासाला वैतागून कामगार महिलेची आत्महत्या
Aurangabad Crime News: मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून सुपरवायझरविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) वाळूज महानगर परिसरात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, कंपनीतील सुपरवायझर (Supervisor) सतत लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याच्या त्रासाला वैतागून कामगार महिलेने आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून सुपरवायझरविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. इस्माईल पठाण (रा. साजापूर रोड, वडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता अनिल वाघमारे (वय 25 वर्षे, रा. वडगाव) ही महिला वाळूज येथील रेमंड कन्झ्युमर केअर या कंपनीत एका ठेकेदारामार्फत कामाला जात होती. दरम्यान या कंपनीत ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करणारा इस्माईल पठाण हा निकितासोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. पण घरची आर्थकि परिस्थिती जेमतेम असल्याने निकिता यांनी सुपरवायझरच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. मात्र इस्माईल पठाण हा सतत लगट करण्याचा प्रयत्न करीत असल्याने निकिता वाघमारे यांनी या प्रकाराची माहिती पतीला दिली होती. निकिता यांनी दिलेल्या माहितीनंतर पतीने कंपनीतील दुसरा सुपरवायझर अनिल होर्शीळ याची भेट घेऊन दोघांनी इस्माईल पठाण यास समजावून सांगितले होते. त्यानंतर जवळपास दोन महिने त्याने कामगार महिलेस त्रास दिला नव्हता. पण त्यानंतर इस्माईल पठाण याने पुन्हा निकिता यांना त्रास देऊन कंपनीत काम करत असताना त्यांचे मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ काढू लागला.
त्रासाला कंटाळून औषध सेवन केलं!
त्यामुळे सततच्या या छळामुळे निकिता वाघमारे यांनी शनिवारी राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. पत्नीने विषारी औषध सेवन केल्याचे समजताच महिलेचा पती अनिल वाघमारे यांनी तिला उपचारासाठी सुरुवातीला बजाजनगरातील खासगी दवाखान्यात दाखवले. त्यानंतर अधिक उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निकिता वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे.
त्रासाला कंटाळून कामही सोडले होते...
इस्माईल पठाणच्या त्रासाला कंटाळून निकिताने कंपनीतील काम सोडले होते. दरम्यान लॉकडाऊननंतर निकिता परत या कंपनीत कामाला जाऊ लागली. तेव्हा इस्माईल पठाण हा पुन्हा तिला त्रास देऊ असल्याने निकिता कामावरून घरी आल्यानंतर टेन्शनमध्ये असायची. दरम्यान, इस्माईल पठाण हा निकिता वाघमारे यांना त्रास देऊन त्यांच्या कामाच्या वेळा बदलणे, जवळीक साधून विनाकारण बोलणे, वेतन कपात करण्याची, तसेच घरच्यांकडे तक्रार करण्याची धमकी देऊन तो तिचा मानसिक छळ करू लागला होता. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी मयत निकिताचे पती अनिल वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुपरवायझर इस्माईल पठाण याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime: तू मला खूप आवडते म्हणत तरुणीचा हात धरत काढली छेड; पोलिसात गुन्हा दाखल