Aurangabad: पुन्हा मुख्यमंत्री म्हणून 'देवेंद्र'जी; औरंगाबादमध्ये लागले होर्डिंग
Politics: शहरातील मुख्य चौकात लावण्यात आलेल्या या होर्डिंगची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
Aurangabad News: एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याची चर्चा आहे. तर शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर सुद्धा देण्यात आल्याचं बोलले जात आहे. जेव्हा अशी चर्चा होत असेल तर यामागचा मास्टर माईंड म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा चर्चा होणे साहजिक आहे. त्यामुळे आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी अपेक्षा भाजपमधील नेत्यांना लागली आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून 'देवेंद्र'जी अशा आशयाचे होर्डिंग लागल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील निराला बाजार परिसरातील मुख्य चौकात फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे होर्डिंग लागले आहे. कुणाल मराठे या कार्यकर्त्याने लावलेल्या होर्डिंगवर,' हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे, तुझ्या पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे, असा उल्लेख करण्यात आला आहे. शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात आलेल्या या होर्डींगची मोठी चर्चा होत आहे. तर राज्यातील घडामोडी पाहता भाजप कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होणार का हे पाहणे सुद्धा तेवढच महत्वाचे ठरणार आहे.
भाजप आमदारांना घरी थांबण्याचे आदेश
राज्यसभा निवडणुकीत फडणवीसांनी राजकीय चमत्कार करून शक्य नसलेला विजय खेचून आणला. त्यांनतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुद्धा विरोधकांचे आमदार फोडून विजयाची पुनरावृत्ती केली. त्यामुळे भाजपच्या गटात आत्मविश्वास वाढला असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत भाजपकडून 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे अशात भाजपच्या आमदारांना सुद्धा आपापल्या मतदारसंघातच थांबण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीला तरी भाजपचे आमदार शिवसेनेतील बंडाचा आनंद घेतांना दिसत आहे.
भाजपने पहिला डाव टाकलाच...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सावध भूमिकेमध्ये असलेल्या भाजपने आता प्रत्यक्ष डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिला भाग म्हणजेच त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांची विधिमंडळात सहयोगी म्हणून नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या रणनीतीचा फायदा त्यांना बहुमत ठरावावेळी होऊ शकतो. त्यामुळे भाजपकडून सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.