Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
Krishnaraaj Mahadik: भाजपकडून अजून कोल्हापुरात उमेदवारी निश्चिती झाली नसतानाही कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Krishnaraaj Mahadik: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार कृष्णराज महाडिक यांनी आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील राजकीय वाटचालीचा प्रारंभ असल्याचं म्हटलं आहे. कुटुंबीयांचा आशीर्वाद आणि मित्रांच्या सहकार्याने आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपकडून अजून कोल्हापुरात उमेदवारी निश्चिती झाली नसतानाही कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम
ही निवडणूक आपण पूर्णपणे स्वतःच्या ताकदीवर लढवत असल्याचं सांगताना, खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्या खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असल्याने ते किती वेळ देऊ शकतील हे माहित नसले, तरी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या साथीनं आपण ही निवडणूक समर्थपणे लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृष्णराज महाडिक म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम केल्याचा अनुभव आहे. नागरिकांकडून मिळणारा विश्वास हीच आपली मोठी ताकद असल्याचं महाडिक यांनी नमूद केलं. सर्वांच्या आशीर्वादाने आणि पाठबळावरच ही निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वारंवार एकाच कामासाठी निधी खर्च
ते म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय आवश्यक आहे. टाऊन प्लॅनिंगच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास करण्याचा मानस आहे. कोल्हापुरात मागील अनेक वर्षांत विकासकामं झाली असली तरी त्यांची देखभाल न झाल्याने वारंवार एकाच कामासाठी निधी खर्च केला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ही प्रक्रिया थांबवून शाश्वत विकासावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. खेळांमुळे शिस्त, नेतृत्व आणि जीवनमूल्ये घडतात, जी केवळ पुस्तकातून शिकता येत नाहीत, असं ते म्हणाले. विरोधकांवर टीका करण्याऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगत, विरोधकांकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांकडे आपण दुर्लक्ष करणार असल्याची भूमिका महाडिक यांनी स्पष्ट केली. अन्य 80 उमेदवारांसाठी विरोधकांची टीका सहन करण्यास आपण तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोल्हापूर शहरात दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री स्तरावर तयार करण्यात आलेला आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचा विश्वास व्यक्त करत, निवडणूक पार पडताच शासनाकडून हा विषय प्राधान्याने हाती घेतला जाईल आणि त्यावर प्रत्यक्ष काम सुरू होईल, असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला.
इतर महत्वाच्या बातम्या





















